छत्रपती संभाजी महाराजांची ओळख ‘धर्मवीर’च
– अजितदादांच्या वक्तव्याचा शिवेंद्रराजेंनी घेतला समाचार
पुणे : आतापर्यंत आपण जो इतिहास वाचला त्यात छत्रपती संभाजी महाराजांची ओळख ‘धर्मवीर’ म्हणूनच इतिहासात केली गेली आहे, त्यामुळे यावर चर्चा होऊ नये, असे सांगत त्यांनी अजित पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते तर स्वराज्य रक्षकच होते, असे रोखठोक वक्तव्य केले होते, याला शिवेंद्रराजेंनी उत्तर दिले.
दरम्यान ‘धर्मांतर’ आणि ‘लव्ह जिहाद’विरोधात कायदा करण्याच्या मागणीने गेल्या काही महिन्यांपासून जोर धरला आहे. राज्यातील विविध ठिकाणी या मागणीसाठी मोर्चे काढण्यात येत आहेत. आज पुण्यातही याच मागणीच्या अनुषंगाने हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. धर्मांतर, गोहत्या आणि लव्ह जिहाद यासाठी कडक कायदे करावेत, त्याची कठोर अंमलबजावणी करावी आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस धर्मवीर दिन म्हणून साजरा करावा या मागण्यांसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने आज ‘हिंदू जन आक्रोश मोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले सहभागी झाले आहेत.
यावेळी मोर्चाला संबोधित करताना शिवेंद्रराजे म्हणाले, ‘हिंदू समाजात जे भीतीचे वातावरण झाले आहे, त्या भीतीला वाचा फोडण्यासाठी आज हा मोर्चा काढण्यात आला आहे. प्रत्येक तालुका-शहरात हा मोर्चा काढला जात आहे.’
केंद्रात मोदींचे सरकार आहे. राज्यात आमचे सरकार आहे, त्यामुळे या मोर्चाच्या मागण्यांची दखल नक्कीच घेण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, त्यामध्ये धर्माचे रक्षण करणे हा देखील भाग होता. आम्ही कोणाच्या विरोधात नाही. परंतु, आमच्या धर्माचे रक्षण आम्ही करत आहोत, असे त्यांनी सांगितले.