सोलापूर : गाणगापूर एसटी बसला अक्कलकोटजवळ आज (दि.२४) सकाळी झालेल्या अपघाताची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. अपघातात जखमी प्रवाशांना तातडीने अक्कलकोट किंवा जवळपासच्या रुग्णालयांत हलवून शासकीय खर्चाने योग्य त्या उपचारांची व्यवस्था करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
त्याचप्रमाणे अपघातात ज्यांना गंभीर दुखापत झाली आहे अशा ठराविक किंवा मोठा अस्थिभंग झालेल्या प्रवाशांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५० हजार रुपये अधिकची आर्थिक मदत करण्यात यावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
अपघात झाल्याचे कळताच मुख्यमंत्र्यांनी सोलापूर जिल्हाधिकारी तसेच एसटी महामंडळ व पोलिसांकडून याची माहिती घेतली व जखमी तसेच इतरही प्रवाशांची व्यवस्था करावी अशा सूचना दिल्या आहेत. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तातडीने केलेल्या मदतीचे त्या भागातील लोकांकडून कौतुक होत आहे.