पाटणा : बिहारमधील छपरा येथे विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू झाल्यामुळे बिहार विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात प्रचंड गदारोळ झाला. भाजपने या मृत्यूंसाठी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना जबाबदार धरले आणि सभागृहाच्या आत आणि बाहेर नितीश सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेधही केला.
विरोधकांच्या गदारोळामुळे नितीशकुमार यांचा संयम सुटला. रागाच्या भरात त्यांनी भाजप आमदारांकडे बोट दाखवत म्हटले की, काय झालं ए, गप्प बस. मुख्यमंत्र्यांच्या या वागणुकीमुळे भाजप आमदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. नितीश कुमार यांनी माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली. या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.
सभागृहात गोंधळ सुरूच
या गदारोळानंतर पुन्हा एकदा सभागृहाचे कामकाज सुरू झाले. भाजपचे आमदार नितीश यांच्या माफीच्या मागणीवर ठाम आहेत. सभागृहात आल्यानंतर भाजपचे आमदार गोंधळ घालत आहेत. मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, नितीशकुमार यांनी शुद्धीवर यावेत, अशा घोषणा भाजप नेत्यांनी दिल्या.