पुणे : कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रयत्न सुरू आहेत. या निवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, जयंत पाटील यांना फोन केला आहे.
कसबा आणि चिंचवड या दोन्ही ठिकाणी उमेदवार न देण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. विरोधी पक्षांना त्यांनी उमेदवार न देण्याचे आवाहन केले आहे. मात्र, महाविकास आघाडीकडून दोन्ही ठिकाणी उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला विरोधक किती प्रतिसाद देतात, हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
कारण या दोन्ही ठिकाणी निवडणुका होणार असल्याचे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. कसब्यातून काँग्रेसचा उमेदवार निवडणूक लढवणार आहे. तर चिंचवडमध्ये कोण निवडणूक लढवणार याचा बसून निर्णय घेऊ. पण चिंचवडच्या जागेसाठी शिवसेना आग्रही असल्याचे राऊत म्हणाले. या दोन्ही ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी निवडणुका होणार की, बिनविरोध होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शरद पवारांनी पुढाकार घ्यावा : केसरकर
कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे. केसरकर शिर्डी येथे आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पोटनिवडणूक बिनविरोध झाली पाहिजे ही महाराष्ट्राची परंपरा आहे. मागील काही काळात ती खंडित झाली होती. त्यावेळी शरद पवार यांनी पुढाकार घेऊन ती परंपरा पुन्हा सुरू केली आहे. पवारसाहेब हे सर्वांचेच नेते आहेत. त्यामुळे ते बिनविरोध निवडणूक करतील, असे दीपक केसरकरही म्हणाले.