22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री शिंदेंना आमदारांच्या घरवापसीची भीती

मुख्यमंत्री शिंदेंना आमदारांच्या घरवापसीची भीती

एकमत ऑनलाईन

मंत्रिमंडळ विस्तारात नाराजी वाढणार, चिंता वाढली
मुंबई : मंत्रिपदाकडे डोळे लावून बसलेल्या शिंदे गटातील आमदारांच्या मनात धुसफूस सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार रखडण्याची शक्यता आहे. आधीच खरी शिवसेना कोणाची, यावर सुप्रीम कोर्टाने अद्याप निर्णय दिलेला नाही. त्यातच मंत्रिपद न मिळाल्यास खट्टू झालेले आमदार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उघड्या ठेवलेल्या दरवाजातून परत जाण्याची भीती शिंदेंना सतावत असल्याची चर्चा आहे. आमदार परत गेल्यास पक्षांतरबंदी कायद्यानुसार शिंदे गट अडचणीत येऊ शकतो.

शिंदे गटाला शिवसेनेच्या एकूण ५४ आमदारांपैकी किमान ३७ आमदार राखून ठेवण्याची गरज आहे. जेणेकरून ही फूट कायदेशीर होईल आणि कायद्यानुसार अपात्रतेची टांगती तलवार टाळता येईल. म्हणजेच शिंदे गटात असलेल्या ४० पैकी किमान ४ शिवसेना आमदार जरी ठाकरेंच्या छावणीत परत गेले, तरी शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदार अडचणीत येऊ शकतात. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंसाठी ही तारेवरची कसरत आहे.

सध्या सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगासमोर खरी शिवसेना कोणती, असा वाद सुरू आहे. मात्र, मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झालेल्या आमदारांनी पुन्हा उद्धव ठाकरेंच्या गटाची वाट धरली, तर ख-या-खोट्या शिवसेनेचा संपूर्ण डोलाराच कोसळेल. कारण शिंदेंचा दावाच कमकुवत ठरेल, असे मत शिदें गटातील एका सदस्याने व्यक्त केले.

शिंदे गटात आलेल्या ४० आमदारांपैकी एकनाथ शिंदे वगळता केवळ ९ जणांनाच आतापर्यंत मंत्री करण्यात आले. म्हणजेच आणखी ३१ आमदारांना कुठल्या ना कुठल्या पद्धतीने सामावून घेणे आवश्यक आहे. मंत्रिमंडळात आणखी जास्तीत जास्त २३ मंत्र्यांचा समावेश केला जाऊ शकतो. युतीतील भागीदार भाजपच्या आमदारांनाही मंत्रिमंडळात जागा देण्याची गरज आहे. पहिल्या विस्तारात भाजपकडूनही ९ मंत्र्यांचा समावेश करण्यात आला होता. परंतु दुस-या मंत्रिमंडळ विस्तारात भाजप आमदारांचा मोठा वाटा दिसेल. कारण ते युतीमधील मोठे भागीदार आहेत. म्हणजेच पुढील विस्तारात शिंदे गटातील किमान पाच ते जास्तीत जास्त दहाच मंत्र्यांचा समावेश होऊ शकतो. पर्यायाने २० ते २५ आमदारांना मंत्रिपदाशिवाय समाधान मानावे लागेल.

छोट्या पक्षांच्याही अपेक्षा वाढल्या
महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणारे छोटे पक्षही मंत्रिपदाची मागणी करत आहेत. प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांच्यासारख्या अनेकांनी शिंदे यांना पडद्याआड इशारेही दिले आहेत. त्यामुळे पुढचा काळ शिंदे गटाची परीक्षा पाहणारा ठरणार आहे.

शिंदे गट, भाजपाचीही कसरत
राज्य सरकारमध्ये आणखी २३ आमदारांना मंत्रिपद मिळू शकते. दुसरीकडे शिंदे गटाच्या सर्व ३१ आमदारांना मंत्रिपदाची अपेक्षा आहे. याशिवाय भाजपच्या आमदारांनाही मंत्रिपद दिले जाणार आहे. अशावेळी आमदारांची मनधरणी कशी करावी, हा शिंदेसमोरील मोठा प्रश्न आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या