मुंबई : राज्यातल्या राजकीय घडामोडींना महिन्याभरापासून चांगलाच वेग आला आहे. या सगळ्यात जोरदार चर्चा आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची. त्यांच्या सभा, दौरे, भाषणं चांगलीच गाजतायत. अशाच एका भाषणाचा एक व्हीडीओ सध्या व्हायरल होतो आहे. त्यात शिंदेंनी फोन करण्यासाठी हवेतच विमान थांबवल्याचा उल्लेख आहे. त्यावरून नेटक-यांनी मुख्यमंत्री शिंदेंची खिल्ली उडवली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फोनवरून काम करण्याची शैली तर आता राज्याच्या लक्षात आली आहे. त्याच संदर्भातला एक किस्सा मुख्यमंत्री शिंदेंनी आपल्या मालेगावमधल्या सभेत सांगितला. मात्र हा किस्सा थट्टेचा विषय झाला आहे. हा व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगतात की, मी विमानात बसलो होतो. लीलावती रुग्णालयात एका डॉक्टरला फोन करायचा होता. पण तो फोन लागत नव्हता. जेव्हा मी पायलटला सांगितले की पाच मिनिटे थांब मला महत्त्वाचा फोन लावू द्या. तेव्हा त्याने दहा मिनिटं विमान थांबवले. माझी चर्चा झाली. आता मुख्यमंत्र्यांचे हे विमान जमिनीवरच होते की हवेत होते, हे मात्र त्यांनी सांगितले नाही.
मात्र नेटक-यांनी यावरून मुख्यमंत्री शिंदेंची चांगलीच खिल्ली उडवली आहे. आता खरे काय खोटे काय हे फक्त मुख्यमंत्री शिंदे आणि त्या विमानाच्या पायलटलाच माहीत.