मुंबई : भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एक आदिवासी महिला राष्ट्रपतिपदी विराजमान होत आहे. त्यानिमित्ताने राष्ट्रपतिपदी निवडून आलेल्या द्रौपदी मुर्मू यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही द्रौपदी मुर्मू यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र ते आता ट्रोल होऊ लागले आहेत.
महाराष्ट्र सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाने एकनाथ शिंदे यांच्या वतीने शुभेच्छा देणारे ट्विट केले आहे आणि यावरूनच आता एकनाथ शिंदे ट्रोल होऊ लागले आहेत. द्रौपदी मुर्मू यांना शुभेच्छा देणा-या या ट्विटमध्ये मुर्मू यांचाच फोटो नाही. फक्त एकनाथ शिंदेंचाच फोटो देण्यात आला आहे. यावरून अनेकांनी शिंदे यांना धारेवर धरले आहे.
अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. तर राष्ट्रपती नक्की कोण झालंय, असा प्रश्नही ही पोस्ट पाहून अनेकांना पडला आहे. अनेकांनी त्यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतही केली आहे. भारताच्या सर्वोच्च अशा राष्ट्रपतिपदावर निवड झाल्याबद्दल श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.
श्रीमती मुर्मू यांची निवड भारतीय महिला जगत तसेच आदिवासी समाजाच्या दृष्टीने ऐतिहासिक आणि अभिमानास्पद अशी आहे – मुख्यमंत्री, असे ट्विट करण्यात आले असून त्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोटोही जोडण्यात आला आहे.