मुंबई : ९४१ कोटींच्या नगर विकास विभागांच्या कामांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्थगिती दिली आहे. विशेष म्हणजे यापैकी तब्बल २४५ कोटींची कामे ही बारामती नगरपरिषदेच्या माध्यमातून होणार होती. यामुळे हा विरोधी पक्षनेते अजित पवारांना धक्का मानला जात आहे. असे असताना मात्र शिवसेनेच्या आमदारांना सॉफ्ट कॉर्नर देण्यात आला आहे.
मार्च २०२२ ते जून २०२२ या काळात मविआ सरकारने हा निधी मंजूर केला होता. मात्र, आता अजित पवारांच्या मतदारसंघात कामांना ब्रेक लागणार आहे. यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांना मंजूर झालेला निधीलाही स्थगिती दिली आहे. शिंदे सरकारने यापूर्वीही अशी भूमिका महानगरपालिकेच्या निधी संदर्भात घेतली होती.
पवारांना केले टार्गेट
काँग्रेस – राष्ट्रवादीच्या आमदारांनी सुचवलेली कामे यांना एकनाथ शिंदे सरकारकडून स्थगिती देण्यात आली आहे. मात्र शिवसेनेच्या आमदारांच्या कामांना कोणतीही स्थगिती देण्यात आली नाहीये. सत्तांतर झाल्यानंतर शिंदेंकडून मविआ सरकारच्या निर्णयावर लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. एका निर्णयातून नव्या सरकारने दोन ठिकाणी निशाणा लावला आहे.