नंदुरबार : वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. याचा परिणाम शेती पिकांवर होत असल्याचे चित्र दिसत आहे. नंदुरबार जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण आहे. याचा परिणाम मिरचीच्या पिकावर होत असल्याचे चित्र आहे. ढगाळ वातावरणामुळे मिरचीवर भुरी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट आली आहे. याचा शेतक-यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
राज्यात कुठे थंडीचा कडाका जाणवत आहे तर कुठे ढगाळ वातावरण असल्याचे चित्र दिसत आहे. या बदलत्या वातावरणामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. कारण बदलत्या वातावरणाचा शेती पिकांवर परिणाम होत आहे. याचा शेतक-यांना मोठा आर्थिक तोटा होत आहे. बदलत्या वातावरणामुळे नंदुरबार जिल्ह्यातील मिरची उत्पादक शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत. कारण ढगाळ वातावरणामुळे मिरचीवर भुरी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. याच्या परिणामी उत्पादनात घट येत आहे.
मिरचीला चांगला दर मात्र उत्पादनात घट
मिरचीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. मात्र, नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे यावर्षी मिरचीच्या उत्पादनात प्रचंड घट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेतक-यांनी मिरचीचे उत्पादन घेण्यासाठी केलेला खर्चही यातून निघणार नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
तर दुसरीकडे मिरचीला बाजारभाव चांगला मिळत असला तरी उत्पादन घटल्याने दुष्काळात तेरावा महिना अशी गत शेतक-यांची झाली आहे. यावर्षी मिरची उत्पादन घटल्याने सर्वसामान्यांच्या जेवणातील चटणीचे दरही वाढणार आहेत. एकूणच मिरचीवर आलेल्या रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शेतक-यांनी टाकलेले भांडवल निघण्याची शक्यता नसल्याने मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.