सोलापूर : स्वत:च्या केवळ १६ महिन्यांच्या चिमुकलीवर अत्याचार करून खून करणाऱ्या नराधम बापास आणि या कृत्यात मदत करणाऱ्या आईस फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपी वडील धोलाराम बिष्णोई आणि आई पुनिकुमारी बिष्णोई दोघांना सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. 3 जानेवारी 2022 रोजी सिकंदराबाद येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला होता.
जानेवारी महिन्यात आई-वडील आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना सोलापुरात घडली होती. स्वत:च्या मुलीवर बापानेच बलात्कार केला आणि तिचा खून केला. नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह घेऊन नराधम आईबाप राजस्थानच्या दिशेने निघाले होते. मात्र रेल्वेतील सहप्रवाशांना शंका आल्याने पोलिसांकडे तक्रार केली. 4 जानेवारी 22 रोजी सोलापुरात गुन्हा दाखल झाल्यानंतर हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात गेले होते.
अवघ्या 9 दिवसात तब्बल 31 साक्ष सरकारी पक्षाच्या तपासण्यात आल्या. रेल्वेत प्रवास करणाऱ्या एका महिलेची नेपाळवरून देखील साक्ष घेण्यात आली. गुन्हा अतिशय गंभीर आणि क्रूर असून कोणतीही दया दाखवू नये असा युक्तिवाद सरकारी पक्षाच्या वतीने करण्यात आला होता. सरकारी पक्षाचा हा युक्तिवाद ग्रा धरत जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश यू. एल. जोशी यांनी या नराधम आई-बापाला फाशी देण्याचा निकाल दिला.
काय आहे प्रकरण?
.सोळा महिन्यांच्या मुलीवर बापानेच अनैसर्गिक अत्याचार करुन गळा आवळून तिची हत्या केल्याची घटना 3 जानेवारी 2022 रोजी घडली होती. हत्या केल्यानंतर मृतदेहाचे पुरावे नष्ट करण्यासाठी घेऊन जात असताना सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी सिकंदराबाद राजकोट एक्सप्रेसमधून पती-पत्नीला ताब्यात घेतले. याप्रकरणी, सोलापूर लोहमार्ग पोलीस दलात कार्यरत असणारे सहायक पोलीस निरीक्षक अमोल गवळी यांनी फिर्याद दिली आहे. मृतदेहाचा वास येऊ नये अथवा कोणाला संशय येऊ नये म्हणून त्यांनी सिकंदराबाद राजकोट एक्सप्रेसच्या एसी डब्यातून प्रवास सुरु केला.
मात्र, सिकंदराबादपासून बाळ रडत नाही, उठत नाही यामुळे डब्यातील प्रवाशांचा संशय बळावला. त्यानुसार प्रवाशांनी तिकीट निरीक्षकला याची माहिती दिली. त्यानंतर गाडी सोलापूर रेल्वे स्थानकावर आली असताना पती पत्नीला खाली उतरवून चौकशी सुरू केली. तेव्हा त्यांनी बाळ आजारी असल्याची माहिती दिली. पोलिसांनी बाळाचा ताबा घेऊन तपासणी केली असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. तसेच, बाळाच्या मृतदेहाची मेडिकल टेस्ट केली असता अनैसर्गिक अत्याचार करत गळा आवळून हत्या केल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी आरोपी आई-वडिलांना अटक केली.
या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील अॅड प्रदिपसिंग रजपूत यांनी काम पाहीले तर आरोपीच्या वतीने अॅड संदीप शेंडगे, अॅड फीरोज शेख,अॅड अंजली बाबरे यांनी काम पाहीले.