24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयचीनी स्मार्टफोन कंपनी शाओमीचे ५,५५१ कोटी जप्त

चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमीचे ५,५५१ कोटी जप्त

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) स्मार्टफोन निर्माता शाओमीवर कर चोरी प्रकरणात आपली पकड घट्ट करत शनिवारी या प्रकरणी मोठी कारवाई केली. ईडीने शाओमी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे बँक खात्यांमध्ये जमा केलेले ५५५१.२७ कोटी रुपये जप्त केले आहेत. यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कंपनीने केलेल्या कर चोरी प्रकरणात ईडीने विदेशी मुद्रा व्यवस्थापन कायदा, १९९९ (फेमा) अंतर्गत ही कारवाई केली आहे.

कंपनीने फेब्रुवारीमध्ये बेकायदेशीरपणे पैसे बाहेर पाठवल्याप्रकरणी तपास सुरू केलेल्या ईडीने कंपनीच्या बँक खात्यातून ही रक्कम जप्त केली. ईडीने सांगितले की, २०१४ मध्ये भारतात काम सुरू केलेल्या शाओमीने रॉयल्टी म्हणून तीन परदेशात असलेल्या संस्थांना ज्यात एक शाओमी समूहाची घटक कंपनीचा देखील समावेश आहे त्यांना ५,५५१.३ कोटी रुपये पाठवले. ईडीने आरोप केला आहे की, ही रक्कम त्यांच्या चिनी मूळ कंपनीच्या सूचनेनुसार पाठवण्यात आली होती. इतर दोन यूएस-बेस्ड असंबंधित संस्थांना पाठवलेली रक्कम देखील शाओमी समूहाच्या फायद्यासाठी पाठविण्यात आली होती, अशी माहिती ईडीने दिली आहे.

ज्यांना एवढी रक्कम हस्तांतरित करण्यात आली आहे, त्या परदेशी कंपन्यांकडून शाओमी इंडियाने कोणतीही सेवा घेतलेली नाही. कंपनीने ही रक्कम रॉयल्टीच्या स्वरूपात परदेशात पाठवली जी फेमाच्या कलम ४ चे उल्लंघन करते. परदेशात पैसे पाठवताना कंपनीने बँकांना दिशाभूल करणारी माहिती देखील दिली, अशी माहिती समोर आली आहे.

एजन्सी किमान फेब्रुवारीपासून कंपनीची चौकशी करत होती आणि अलीकडेच शाओमीचे माजी भारतीय व्यवस्थापकीय संचालक मनु कुमार जैन यांना त्यांच्या अधिका-यांसमोर हजर राहण्यास सांगितले होते. ईडीने केलेली कारवाई ही आयकर (आयटी) विभागाने केलेल्या तपासानंतर केली आहे, ज्यांनी यापूर्वी या कंपन्यांवर छापे टाकले होते. या कारवाईच्या दरम्यान कर चोरीच्या आरोपांना दुजोरा देणारा डेटा जप्त केल्याचा दावा कर अधिका-यांनी केला होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या