मुंबईः अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीने इंटेरिअर डिझाइनच्या कामाची ८३ लाख रुपयांची देणी थकवून अन्वय नाईक आणि त्यांच्या आई कुमुद नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हा अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपवण्यात आल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. या प्रकरणाचा संपूर्णपणे नव्याने फेरतपास करावा, असे देशमुख यांनी सीआयडीला दिलेल्या आदेशात म्हटले आहे.
आज्ञा नाईक यांनी मला तक्रारीत म्हटले होते की, अर्णब गोस्वामींच्या रिपब्लिक टीव्हीने देणी थकवून त्यांच्या वडिलांना आणि आजीला आत्महत्येस प्रवृत्त केले. ही बाब अलिबाग पोलिसांनी नीट तपासली नाही. या केसमध्ये सीआयडीकडून संपूर्णपणे नव्याने तपासाचे आदेश मी दिले आहेत, असे ट्विट गृहमंत्री देशमुख यांनी केले आहे. हे ट्विट करताना अनिल देशमुख यांनी महाराष्ट्र गव्हर्नमेंट केअर्स असा हॅशटॅगही वापरला आहे. गृहमंत्र्यांच्या या घोषणेमुळे अर्णब गोस्वामी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पालघरमध्ये जमावाकडून तीन साधूंची हत्या करण्यात आल्यानंतर अर्णब गोस्वामी यांनी रिपब्लिक टीव्हीवर केलेल्या शोमुळे वाद निर्माण झाला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी त्यांना चौकशीसाठीही बोलावले होते. त्यात आता त्यांच्या रिपब्लिक टीव्हीने देणी थकवून दोघांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे प्रकरण नव्याने पुढे आल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढणार आहेत.
Read More जगातील सर्वात खोल सोन्याच्या खाणीत कोरोना
अन्वय ईक आणि त्यांच्या आई कुमुद नाईक यांनी मे २०१८ मध्ये संशयास्पदरित्या आत्महत्या केली होती. या प्रकरणी आज्ञा नाईक यांनी दिलेल्या तक्रारीत अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीने वडिलांच्या कामाचे पैसे न दिल्यामुळे वडिल आणि आजीने आत्महत्या केल्याचे म्हटले होते. या प्रकरणी अलिबाग पोलिसांनी केलेल्या तपासावर आपण असमाधानी असून गुन्हेगारी प्रक्रिया संहितेमधील ( सीआरपीसी) कलम १७३ (८) मधील अधिकारांचा वापर करून हे प्रकरण राज्य गुन्हा अन्वेषण विभाग अथवा गुन्हे शाखेकडे वर्ग करावे आणि अलिबागमधील तत्कालीन तपास अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश द्यावेत, अशी विनंती अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा नाईक यांनी गृहमंत्री देशमुख यांच्याकडे केली होती. त्यावर गृहमंत्र्यांनी अलिबाग पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्चर नंबर ५९/२०१८ व गु.र.नं. ११४/२०१८ या प्रकरणाचा संपूर्णपणे नव्याने तपास करण्याचे आदेश सीआयडीला दिले आहेत.
काय आहे प्रकरणः अन्वय नाईक हे कॉन्कॉर्ड डिझाइन्स प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक होते. ही कंपनी आर्किटेक्चर आणि इंटेरिअर डिझाइनचे काम करते. अर्णब गोस्वामी यांनी कॉन्कॉर्ड कंपनीकडून रिपब्लिक टीव्हीच्या आर्किटेक्चर आणि इंटेरिअर डिझाइनचे काम करून घेतले. परंतु अर्णब यांनी ८३ लाख रुपये दिलेच नाहीत. त्यामुळे वडिल आणि आजीला आत्महत्या करावी लागली, असा आज्ञा नाईक यांचा आरोप आहे. अलिबाग पोलिसांनी या दृष्टिकोनातून तपासच केला नसल्याचाही आज्ञा नाईक यांचा आरोप आहे.
आज्ञा नाईक यांनी मला तक्रारीत म्हटलं होतं की अर्णब गोस्वामींच्या @republic ने देणी थकवून त्यांच्या
वडिलांना व आजीला आत्महत्येस प्रवृत्त केलं ही बाब
अलिबाग पोलिसांनी नीट तपासली नाही. या केसमध्ये #CID कडून संपूर्णपणे नव्याने तपासाचे आदेश मी दिले आहेत.#MaharashtraGovtCares— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) May 26, 2020