22 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्रलिपिकांची रिक्त पदे एमपीएससीद्वारे भरणार

लिपिकांची रिक्त पदे एमपीएससीद्वारे भरणार

एकमत ऑनलाईन

पोलिसांच्या सुट्या वाढवल्या -राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई : कामाच्या ताणामुळे जेरीस आलेल्या पोलिसांच्या सुट्यामध्ये वाढ करण्याचा, तसेच वर्ग ३ मधील लिपिकांची सर्व रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

राज्यातील पोलिस शिपाई ते पोलिस निरीक्षक यांच्या नैमित्तिक रजा १२ वरून २० करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. पाचव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार राज्य शासकीय कर्मचा-यांना एक वर्षात १२ ऐवजी ८ रजा मंजूर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. नंतर विशेष बाब म्हणून १२ दिवस नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आल्या. मात्र, पोलिसांवरील कामाचा वाढता ताण, विविध सण आणि उत्सवाच्या अनुषंगाने बंदोबस्त, व्हीआयपी ड्युट्या यामुळे या नैमित्तिक रजा आणखी वाढवून २० दिवस करण्यास आज मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.

राज्यातील वर्ग ३ मधील लिपिकांची सर्व रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सध्या राज्यातील अ आणि ब गटातील अधिका-यांची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही आयोगामार्फत केली जाते. आयोगाच्या कार्यक्षमतेचा विचार करून मुंबई प्रमाणेच राज्यभरातील लिपिकांचीदेखील रिक्त पदे आयोगामार्फतच भरण्यात यावीत, असे ठरवण्यात आले आहे.

केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनी स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्य शासन विविध संस्थांना जमीन, भागभांडवल, अनुदान, कर्ज हमी देते. त्यांच्या मालमत्ता वेगवेगळ््या कारणास्तव संकटात सापडल्या, तर त्यांच्या पुनर्निर्माणात शासनाची भूमिका मर्यादित असते. पर्यायाने शासनाचे म्हणजेच जनतेचे नुकसान होते. राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनी स्थापन झाल्यास अशा आजारी व पारदर्शक कारभार न करणा-या संस्थांचे पुर्ननिर्माण करणे शक्य होणार आहे. या कंपनीचे भागभांडवल १११ कोटी निश्चित करण्यात आले असून वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव कंपनीचे अध्यक्ष आणि वित्तीय सुधारणा सचिव व्यवस्थापकीय संचालक, सार्वजनिक उपक्रम सह सचिव संचालक आणि सहकार तसेच वस्त्रोद्याग आणि उद्योग विभागाचे प्रधान सचिव पदसिद्ध संचालक असतील.

पोलिस भरतीला मान्यता
राज्यात घोषणा करण्यात आलेल्या एकूण पदांपैकी सध्या ७२३१ पदांना मान्यता देण्यात आली आहे. पोलिस महासंचालकांमार्फत पद भरतीच्या जाहिरातीची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. दरम्यान, भरतीवेळी लेखी परीक्षेपूर्वी अगोदर शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. यासाठी मुंबईमधील २० मैदानांवर संपूर्ण तयारी करण्यास सांगण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय संगीत
कॉलेज सुरू होणार
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयांतील प्रमाणपत्र अभ्यासक्रमांना २८ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयांतील प्रमाणपत्र अभ्यासक्रम पु. ल. देशपांडे अकादमीमध्ये तात्पुरत्या काळासाठी २८ सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात निर्देश दिले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या