मुंबई : राज्याच्या काही भागात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. कोकणासह काही भागात सुरु असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपत्ती व्यवस्थापन आणि मदत कार्यावर लक्ष ठेऊन आहेत. पूर परिस्थितीवर उपाययोजना म्हणून राज्यातील विविध जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या (एसडीआरएफ) ११ टीम तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच बेस स्टेशनवर एनडीआरएफच्या ९ आणि एसडीआरएफच्या ४ अशा एकूण १३ टीम सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. नदीच्या पातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक पातळीवर उपाय योजना करण्यात येत आहेत.
राज्यातील संपूर्ण कोकणसह अमरावती विभागातील काही तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच काही ठिकाणी नदीच्या पातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक पातळीवर उपाय योजना करण्यात येत आहेत. तसेच आवश्यकअसणा-या ठिकाणी राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. दुपारपर्यंत कोकण विभागातील पालघर जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १०० मिमी. पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत असून हवामान विभागाकडून अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.