पुणे : येत्या ४८ तासांत नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक जिल्ह्यातील काही भागांत थंडीची लाट ते तीव्र शीत लहरीची शक्यता आहे, तर पुणे, अहमदनगर जिल्ह्यातील काही भागांत थंडीची लाट निर्माण होण्याची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवली. तसेच मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या आठही जिल्ह्यांसह विदर्भातील काही भागांत थंडीची लाट उसळू शकते.
उत्तरेकडून येणा-या थंडगार वा-यामुळे थंडी परतली आहे. गारठवणा-या थंडीमुळे परत शेकोट्या पेटल्या आहेत. गोंदियात काल या मोसमातील किमान ७ अंश सेल्सियस अशा नीचांकी तापमानाची नोंद झाली. नागपुरात किमान ८.५ अंश सेल्सियस इतके कमी तापमान नोंदले गेले. विदर्भातील तापमानात सरासरी २ अंशाने घट झाली आहे. त्यामुळे थंडीने विदर्भ गारठला आहे.
विदर्भातील गोंदियात कमी ६.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे, तर विदर्भातील जवळजवळ सर्वच शहरात किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. याशिवाय अकोला १०.४, अमरावती ९.९, बुलढाणा १०.०, ब्रम्हपुरी १०.४, चंद्रपूर १०.४, गडचिरोली ९.६, वर्धा ९.९, यवतमाळ ८.५ व वाशिम येथे ११.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
३१ जानेवारीपर्यंत थंडी कायम राहणार?
विदर्भात थंडी वाढली असून, ही थंडी ३१ जानेवारीपर्यत राहील. त्यानंतर पूर्वेकडून तसेच दक्षिण-पूर्वेकडून येणा-या वा-यामुळे थंडी कमी होत जाईल, असे प्रादेशिक हवामान केंद्राच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, थंडीची लाट पुढील ५ दिवस राहील, असा अंदाजही वर्तवला जात आहे.
तापमानात २ अंशांनी घट
विदर्भात सरासरी २ अंशाने पारा घसरल्याने थंडीने उसळी घेतली आहे. थंडी वाढल्याने स्वेटर, मफलर, कानटोप्या, हातमोजे, जर्कीन घातल्याशिवाय लोक बाहेर निघत नाहीत. सायंकाळी ५ नंतर अंधारायला होते आणि थंडीमुळे गारठायला होते. बोच-या वा-यामुळे दिवसा ऊन असले तरी सायंकाळपासून गारठा वाढला आहे.