27.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रसाखर उद्योगाच्या प्रगतीसाठी एकत्रितपणे दूरगामी धोरण आखावे

साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी एकत्रितपणे दूरगामी धोरण आखावे

एकमत ऑनलाईन

पुणे : साखर उद्योगात भविष्यात येणा-या समस्या लक्षात घेऊन दूरगामी धोरण आखल्यास त्याचा सकारात्मक परिणाम या उद्योगाच्या प्रगतीवर होईल. त्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींनी एकत्र यावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे आयोजित साखर परिषद-२०२२ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, साखरेतला गोडवा पवार साहेबांनी राजकारणात आणला आहे आणि सगळ्या पक्षांचे नेते पक्षीय जोडे काढून राज्य आणि देशाच्या हिताचा विचार करताहेत ही निश्चित चांगली बाब आहे.

साखर उद्योग हा महाराष्ट्राचा मुख्य उद्योग आहे. साखरेचे महत्त्व लक्षात घेता पुढील नियोजन करणे गरजेचे आहे. ऊसतोड कामगार, शेतकरी, साखर कारखानदार हे राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देत असतील तर त्यांना सहकार्य करणे शासनाचे कर्तव्य आहे.

साखर कारखाने तोट्यात चालत असताना उद्योगाच्या नियोजनाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. साखर परिषदेमध्ये या उद्योगातील समस्यांवर विचार व्हावा. साखर महासंघाने या उद्योगातील अडचणी सोडविण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. ब्राझीलने साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी केलेल्या उपायांचा अभ्यास करून आपणही अनुकूल बदल करणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतक-यांना संघटित करून त्यांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. आपला शेतकरी कष्टासाठी मागे पडत नाही. मात्र त्यांना नवे तंत्र आणि नियोजन याबाबत मार्गदर्शन करावे लागेल.

राज्य शासन साखर उद्योगाच्या उत्कर्षासोबत या क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. या क्षेत्रातील नवे तंत्रज्ञान स्वीकारून भविष्याचा वेध घेतला तर चांगली प्रगती साधता येईल. इथेनॉलकडे एक पर्यायी इंधन म्हणून पाहायला पाहिजे. राज्य सरकार इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देत आहे

. ऊसतोड कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाने गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगारांसाठी महामंडळ स्थापन केले आहे. त्या माध्यमातून ऊसतोड कामगारांचे प्रश्न सोडविता येतील. उसाचे पीक सूक्ष्म सिंचनाखाली कसे आणता येईल याचा विचार व्हायला हवा, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या