बारामती : फसवणुकीच्या व्यवहारात संबंधित व्यक्तीला अटक करण्यापेक्षाही ज्यांचे पैसे धोक्यात येतात त्यांचे पैसे परत मिळण्याच्या दृष्टीने मालमत्तांचा वेगाने लिलाव करून ते पैसे परत करण्यासाठी केंद्राने प्रयत्न करावेत, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
बारामतीत आज माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, याबाबत संसदेत मी भूमिका मांडली आहे. बुडीत बँकांबाबत जेव्हा फसवणुकीचा प्रकार घडतो तेव्हा संबंधिताला अटक होते, ती व्यक्ती जेलमध्ये जाते, मात्र त्याच्या मालमत्तांचा वेगाने लिलाव होत नाही, अनेकदा या मालमत्ता लोक घेत नाहीत, पर्यायाने ज्यांची फसवणूक झालेली आहे, त्यांचे पैसेही अडकून राहतात.
या संदर्भात मी केंद्रीय अर्थमंत्र्यांना अशी विनंती केली आहे की, त्याला अटक करणे न करणे हा कायद्याचा विषय आहे, मात्र पहिले काम यात असे होणे गरजेचे आहे की त्यांच्या मालमत्ता विकल्या गेल्या पाहिजेत, ते विकून ठेवीदार व गुंतवणूकदारांना पहिल्यांदा पैसे दिले गेले पाहिजेत, ही सर्व प्रक्रिया क्लिष्ट व लांबलचक आहे, ही प्रक्रिया सुटसुटीत केली पाहिजे ही बाब अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मान्य केली असल्याने मी त्यांचे आभार मानते. याबाबत त्या लवकरच काही निर्णय घेतील अशी मला अपेक्षा आहे.
आगामी अधिवेशनात केंद्राकडे जप्त केलेल्या मालमत्ता विकून किती निधी आला आहे आणि या मालमत्ता विकून सामान्यांचे पैसे का परत दिले जात नाहीत, याबाबत मी प्रश्न उपस्थित करणार आहे, असेही खा. सुळे म्हणाल्या.