मुंबई : संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा तरुणांच्या रोजगारासंदर्भात एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यात आली आहे. यात त्यांनी मराठा तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न मांडला आहे.
अनेक मराठा तरुणांची नोकरीसाठी निवड झाली पण त्यांची नियुक्ती अद्याप झालेली नाही. त्यांची नियुक्ती होण्याबाबत त्यांनी मागणी केली आहे. ‘शासकीय सेवेत निवड होऊनही नियुक्ती न झालेल्या मराठा उमेदवारांना त्यांची ज्या पदांवर निवड झाली आहे, त्याच पदांवर नियुक्ती द्यावी, हा माझ्या आमरण उपोषणाचा एक मुख्य मुद्दा होता. त्यावेळी मंत्री असलेले एकनाथजी शिंदे हे तत्कालीन सरकारचे प्रतिनिधी म्हणून मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन घेऊन आझाद मैदान येथे उपोषणस्थळी आले होते.
आज ते स्वत: मुख्यमंत्री आहेत. त्यावेळी त्यांनी मराठा समाजाच्या मागण्यांबाबत जी आश्वासने दिली होती, ती त्यांनी पूर्ण करावीत. अत्यंत संवेदनशील असणारा नियुक्त्यांचा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने सोडवावा’’, अशी फेसबुक पोस्ट संभाजीराजे छत्रपती यांनी लिहिली आहे.
संभाजीराजेंचे आमरण उपोषण
संभाजीराजे छत्रपती यांनी काही मागण्यांसाठी आमरण उपोषण केले होते. फेब्रुवारी महिन्यात त्यांनी हे उपोषण केले होते. सरकारच्या वतीने मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, दिलीप वळसे-पाटील आणि अमित देशमुख यांनी संभाजीराजे छत्रपती यांची आझाद मैदानात भेट घेऊन त्यांच्या मागण्या मान्य केल्याचे लेखी आश्वासन दिले होते. तसेच एकनाथ शिंदे यांनी या मागण्या सर्वांसमोर वाचून दाखवल्या होत्या.