24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांचा निषेध करत शिवसेनेकडून पुन्हा एकदा अभिवादन

मुख्यमंत्र्यांचा निषेध करत शिवसेनेकडून पुन्हा एकदा अभिवादन

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त सकाळच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते औरंगाबादमध्ये आज ध्वजारोहण करण्यात आले. मात्र ९ वाजता होणारे हे ध्वजारोहण ७ वाजताच उरकण्यात आले. त्यामुळे याचा निषेध म्हणून शिवसेनेकडून पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी ध्वजारोहण केलेल्या ठिकाणी अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची उपस्थिती पाहायला मिळाली.

१७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरा केला जातो. मात्र यावर्षी याच मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या ध्वजारोहणाच्या वेळेवरून शिवसेना-शिंदे गटातील राजकीय वाद पाहायला मिळाले. दरवर्षी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानात सकाळी नऊ वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. मात्र यावर्षी सकाळी सात वाजताच ध्वजारोहण करण्यात आले. त्यामुळे यावर शिवसेनेने आक्षेप घेतला आहे.

स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान : शिवसेनेचा आरोप…
यावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, दिल्लीतून पातशहा हैदराबादच्या कार्यक्रमाला येणार आहे. त्याच कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनासुद्धा उपस्थित राहायचे होते. यासाठी औरंगाबादच्या ध्वजारोहणाची वेळ बदलण्यात आली.
मुख्यमंत्र्यांची ही भूमिका म्हणजे मराठवाडा मुक्तिसंग्रामासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान आहे. याचाच निषेध करण्यासाठी आम्ही नऊ वाजता पुन्हा एकदा अभिवादन केल्याचे दानवे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी ज्या घोषणा केल्या त्या जुन्या आहेत, त्यातील अनेक कामं सुरू आहेत. नवीन कोणतीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली नसून हा मराठवाड्यावर अन्याय आहे. पश्चिम महाराष्ट्रापेक्षा मराठवाडा मागे आहे. त्याला पुढे आणण्यासाठी हा क्षण होता मात्र मुख्यमंत्र्यांनी काही घोषणा केल्या.

नऊ वाजता आम्ही पुन्हा एकदा अभिवादन करणार आहोत, असे दानवेंनी सांगितले. दानवे म्हणाले की, भूखंडाच्या सर्व फाईल थांबवल्या आहेत, एमआयडीसीच्या अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. उद्योगासाठी हे घातक असून यापूर्वी असे कधीही झाले नाही. उद्योजक नाराज असून दिल्लीपर्यंत याच्या तक्रारी गेल्या आहेत, असेही दानवे म्हणाले.
मराठवाडा मुक्तिसंग्रामच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी फक्त १५ मिनिटे वेळ देणे हा मराठवाडा मुक्त करणा-यांचा अवमान असल्याची टीका शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंनी केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या