मुंबई : विधानसभेत आजही अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान आणि कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणावर पडलेले असल्याने विरोधकांनी बराच गोंधळ घातला. विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतापले आणि त्यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.
कांदा प्रश्नावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुद्दा उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही कांदा खरेदी झालेली नाही, असे अजित पवार यांनी सभागृहात सांगितले. पवारांच्या या मुद्याला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उठले आणि बोलू लागले.
पण अजित पवारांची बाजू लावून धरताना विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालायला सुरुवात केली. विरोधक ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नसल्याने मुख्यमंत्री चांगलेच भडकले.
शेतक-यांना १२ हजार कोटी रुपये दिले : मुख्यमंत्री शिंदे
उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, काल आणि परवाही मी सांगितले की नाफेडची खरेदी सुरू झालेली आहे. सगळीकडे नाही तर काही ठिकाणी नाफेडची खरेदी सुरू झालेली आहे.
या कांदा उत्पादक शेतक-याला दिलासा देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. यावर छगन भुजबळ यांनी दिलासा कधी देणार? असा सवाल विचारला. त्यानंतर मुख्यमंत्री भडकले आणि म्हणाले, आम्ही शेतक-यांना १२ हजार कोटी रुपये दिले. तुमच्यासारखी शेतक-यांच्या तोंडाला पानं पुसली नाहीत. नियमित कर्जफेड करणा-या शेतक-यांना ५०,००० रुपये देतो बोलून दिले का? आम्ही दिले ते!
कांदा उत्पादक शेतक-याला देखील सरकार न्याय देईल. त्याला क्विंटलप्रमाणे न्याय दिला जाईल. शेतक-यांच्या मागे सरकार खंबीरपणे उभे राहिले, शेतक-यांना वा-यावर सोडणार नाही, अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.