24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeराष्ट्रीयलसीकरणातील अंतरावरून संभ्रम

लसीकरणातील अंतरावरून संभ्रम

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढविल्याने कोव्हिडच्या विषाणूंची बाधा होण्याची शक्यता वाढत असल्याचा इशारा अमेरिकेच्या अध्यक्षांचे वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फाउची यांनी शनिवार दि़ १२ जून रोेजी दिला आहे. दरम्यान भारताने लसीकरणातील अंतर कमी करण्याची गरज नसल्याचे म्हटल्याने सर्वसामान्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे़

केंद्र सरकारने गेल्या महिन्यांत दोन डोसमधील अंतर ८४ दिवसांपर्यंत वाढविले आहे. त्यावर फाउची बोलत होते. ते म्हणाले, मॉडर्नाच्या दोन डोसमधील अंतर चार आठवडे आणि फायझरच्या दोन डोसमधील अंतर तीन आठवडे आहे. दोन डोसमधील अंतर वाढविले तर तुम्ही कोरोनाच्या विषाणूला बळी पडण्याची शक्यता वाढते. ब्रिटनमध्ये हेच घडले. त्यांनी दोन डोसमधील अंतर वाढविले आणि तेथे त्या काळात कोरोनाच्या व्हेरियंटचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे आम्ही दोन डोसमधील अंतर निश्चित असण्याची शिफारस करतो. लसीचा पुरवठा अल्प असल्याने दोन डोसमधील अंतर वाढविले असावे, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

केंद्र सरकारने गेल्या महिन्यांत कोव्हिशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर सहा ते आठ आठवड्यावरून १२ ते १६ आठवडे केले होते. कोव्हिशील्डच्या लसीमधील हे अंतर तीन महिन्यांत दुस-यांदा वाढविण्यात आले होते. मार्च महिन्यांत राज्यांना लसीच्या दोन डोसमधील अंतर २८ दिवसांवरून सहा ते आठ आठवडे करण्याचे आदेश देण्यात आले होते. यामुळे लसीची परिणामकारकता वाढत असल्याचे सांगण्यात आले.

तुटवडा असल्याने अंतर वाढविले असावे
सरकार जास्तीत जास्त लोकांना लसीचा पहिला डोस देण्यासाठी आणि लसीचा तुटवडा असल्याने हे बदल करीत असल्याचे दिसून येत होते. हा माफक दृष्टिकोन असल्याचे फाउची म्हणाले. कोरोना विषाणूच्या पुढे राहण्यासाठी जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करणे महत्त्वाचे आहे.

डेल्टासाठी लसीकरण अत्यावश्यक
विशेषत: डेल्टा व्हेरियंटसाठी ते आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले. डेल्टा विषाणू अधिक जोरकसपणे पसरतो आणि त्यामुळे हा विषाणू असलेल्या कोणत्याही देशानेचिंता करावी. त्याचा मुकाबला करण्यासाठी मोठी तयारी आणि लसीकरण करावे, असेही फाउची म्हणाले.

अंतर कमी करण्याची आवश्यकता नाही : पॉल
कोविड-१९ संदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये निती आयोगाचे आरोग्यविषयक सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. सध्या घाबरून जाण्याची, लस बदलण्याची किंवा लसींच्या दोन डोसमधले अंतर कमी करण्याची काहीएक आवश्यकता नाही. अशा प्रकारचे निर्णय हे काळजीपूर्वक घ्यावे लागतात. आपण डोसमधले अंतर वाढवले, तेव्हा कोरोनामुळे एकच डोस घेतलेल्या व्यक्तींना असलेला धोका देखील आपण विचारात घेतला होता. पण त्याचवेळी असे केल्यामुळे अधिकाधिक लोकांना लसीकृत करणे शक्य होणार होते़ ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येची प्रतिकारशक्ती वाढणार आहे, असे पॉल यांनी सांगितले.

पंजाबमध्ये अकाली दल-बसप पुन्हा एकत्र

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या