मुंबई : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं एक विधान सध्या चांगलंच चर्चेत आहे. या विधानावरुन फक्त राजकारणातच नव्हे तर सोशल मीडियावरही खळबळ सुरू आहे. आता त्यांच्या याच विधानावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांचं अभिनंदन करत खोचक टोलाही लगावला आहे.
शनिवारी पनवेलमध्ये भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक होती. या बैठकीच्या वेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, मनावर दगड ठेवून आपण एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं. दु:ख झालं, पण आपल्याला गाडा पुढे हाकायचा होता. केंद्राने आदेश द्यायचे आणि आपण ते मानायचे. त्यांच्या याच विधानावरुन खळबळ वाजली. शेवटी भाजपाने या कार्यकर्त्यांच्या भावना असल्याचं सांगत हे प्रकरण झाकायचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत टीकेची राळ मोठ्या प्रमाणावर उठली होती.
माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊतांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे. राऊत म्हणाले, भाजपात अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. देशातही हीच परिस्थिती आहे. पण मी चंद्रकांत पाटलांचं अभिनंदन करतो. पुण्यात राहत असताना, कोल्हापूरशी फारसा संबंध येत नसतानाही त्यांनी आपलं कोल्हापूरचं पाणी दाखवलंय आणि हे विधान केलंय. त्यांच्या पोटातली मळमळ ओठावर आली आहे. त्यामुळे त्यांना नंतर खुलासा करावा लागला. ही भाजपा कार्यकर्त्यांची भावना आहे, असं सांगावं लागलं.