नागालँड : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार असल्याचा दावा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. मल्लिकार्जुन खरगे मंगळवारी नागालँडमध्ये एका सभेला संबोधित करत होते. १०० मोदी आणि १०० शहा आले तरी सरकार काँग्रेसचेच बनणार असल्याचे ते म्हणाले.
खरगे म्हणाले की, २०२४ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधक भाजपला हटवतील. आम्ही इतर पक्षांशीही याबाबत बोलत आहोत, अन्यथा देशातील लोकशाही आणि संविधान संपुष्टात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हुकूमशहासारखे वागत असल्याचेही खरगे म्हणाले.
खरगे म्हणाले, मोदी अनेकदा म्हणतात की, देशाला तोंड देणारी एकमेव व्यक्ती आहे. त्यांना या देशातील अन्य कोणीही स्पर्श करू शकत नाही. असे कोणीही लोकशाहीवादी म्हणू शकत नाही. तुम्ही लोकशाहीत आहात हे लक्षात ठेवा. तुम्ही हुकूमशहा नाही. तुम्हाला जनतेने निवडून दिले आहे आणि ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिले तेच तुम्हाला २०२४ मध्ये धडा शिकवतील.
ते म्हणाले की, केंद्रात आघाडीचे सरकार येणार आणि काँग्रेस त्याचे नेतृत्व करेल. आम्ही इतर पक्षांशी बोलत आहोत. आम्ही लोकांशी बोलत असतो, त्यांच्याशी आमच्या कल्पना शेअर करत असतो. आम्ही २०२४ च्या निवडणुका कशा जिंकायच्या याबद्दल बोलत आहोत. आता भाजप बहुमतात येणार नाही. इतर पक्षांना सोबत घेऊन काँग्रेसच्या नेतृत्वाखाली बहुमत मिळवू. आम्ही संविधान आणि लोकशाहीसोबत जाऊ.
काँग्रेसच्या लोकांनी स्वातंत्र्यासाठी प्राण दिले
आमच्या लोकांनी स्वातंत्र्यासाठी आपले प्राण दिले आहेत. काँग्रेसवाल्यांनी जीव दिला. भाजपच्या लोकांनी दिलेला नाही. मला भाजपचा असा एक माणूस दाखवा जो स्वातंत्र्यासाठी लढला, तुरुंगात गेला. जो माणूस स्वातंत्र्यासाठी लढत होता…ते महात्मा गांधी…. त्यांना या लोकांनी मारले. असे लोक देशभक्तीच्या गप्पा मारत असतात. ज्यांनी जीव घेतला तेच आम्हाला शिकवत आहेत. इंदिराजी, राजीव गांधी यांनी देशाच्या एकात्मतेसाठी आपले प्राण दिले. ज्यांनी भाजपमध्ये कोणी आपला जीव दिला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. २०१४ मध्येच स्वातंत्र्य मिळाले असे त्यांना वाटते, त्यांना १९४७ आठवत नाही, असेही ते म्हणाले.