मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार बरखास्तीच्या दिशेने जात आहे, असे ट्विट करून शिवसेना नेते संजय राऊत यांनी खळबळ उडवून दिली होती.
त्यांच्या या ट्विटमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रचंड नाराज झाल्याची माहिती आहे. संजय राऊत यांच्या या ट्विटबद्दल काँग्रेसच्या नेत्यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. तेव्हा या नेत्यांनी अक्षरश: कानावर हात ठेवत असे काही ठरलेच नसल्याचे म्हटले.
महाविकास आघाडीत अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. सरकार चालवण्यासाठी आमच्याकडे पुरेसे संख्याबळ आहे. आम्ही पुढील अडीच वर्षे सरकार चालवू, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
तर बाळासाहेब थोरात यांनीही ही शक्यता फेटाळून लावली आहे. महाविकास आघाडीने सरकार बरखास्त करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे थोरात यांनी स्पष्ट केले आहे. तर दुस-या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही संजय राऊत यांनी परस्पर ट्विट केल्याबद्दल नाराजी जाहीर केल्याचे समजते.