नवी दिल्ली : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी यासाठी एक टास्क फोर्स स्थापन केला आहे. यासोबतच ८ सदस्यीय राजकीय व्यवहार समितीदेखील (पीएसी) स्थापन करण्यात आली आहे.
काँग्रेसच्या पीएसीमध्ये खासदार राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, गुलाम नबी आझाद, अंबिका सोनी, दिग्विजय सिंग, आनंद शर्मा, केसी वेणुगोपाल, जितेंद्र सिंग या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. २०२४ च्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या टास्क फोर्सच्या सदस्यांवर नजर टाकली तर त्यात पी. चिदम्बरम, मुकुल वासनिक, जयराम रमेश, केसी वेणुगोपाल, अजय माकन, प्रियंका गांधी, रणदीप सुरजेवाला, सुनील कनगोलू यांची नावे आहेत.
भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून कॉंग्रेसला मजबूत करण्याची योजना आखण्यात आली असून, यासंबंधीच्या केंद्रीय नियोजन गटात अनेक बड्या चेह-यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये दिग्विजय सिंग, सचिन पायलट, शशी थरूर, रवनीतसिंग बिट्टू, केजे जॉर्ज, जोथी मणी, प्रद्युत बोलडोलोई, जीतू पटवारी, सलीम अहमद यांची नावे आहेत.
पक्षाची स्थिती आणि पुढील रणनीती यावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसने नुकतेच उदयपूर येथे चिंतन शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी संघटनात्मक बदलाबाबत चर्चा केली होती. यासोबतच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पॉलिटिकल अफेअर्स ग्रुप आणि टास्क फोर्सचीही घोषणा केली होती.
जी-२१ गटातील २ नेत्यांचाही समावेश
विशेष म्हणजे काँग्रेसने आपल्या नॅशनल प्लॅनमध्ये प्रियंका गांधी यांच्यासह जी-२१ गटाचे दोन नेते गुलाम नबी आझाद आणि शशी थरूर यांचा समावेश केला आहे.