मुंबई : वाढती महागाई आणि इतर विविध मुद्यांवर काँग्रेसच्या वतीने उद्या सर्व जिल्ह्यांमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर याच मुद्यावरून राजभवनाला घेराव घालण्यात येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये उद्या काँग्रेस आंदोलन करेल.
या माध्यमातून अतिवृष्टी, अग्निपथ योजना, महागाई, बेरोजगारी या सर्व मुद्यांवर संपूर्ण देशभरात काँग्रेस आंदोलन करणार आहे.
यासाठी राज्यपाल भवनावर देखील आम्ही आंदोलन करणार आहोत, त्यांना घेराव घालणार आहोत. तसेच यावेळी त्यांना आम्ही याबाबत निवेदन देणार आहोत, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.
अग्निपथ योजनेला तरुणांचा विरोध
मोदी सरकारने जीएसटीतून शाळकरी मुलांनाही सोडले नाही, शालेय वस्तूंवरही जीएसटी लावला आहे. रुग्णालयात उपचार घेण्यावरही जीएसटी भरावा लागणार आहे. मागील ४५ वर्षातील बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. २०१४ ते २०२२ पर्यंत विविध विभागांमध्ये नोक-यांसाठी २२ कोटी अर्ज मिळाले मात्र केवळ ७ लाख उमेदवारांना नोकरी देण्यात आल्याचे केंद्र सरकारनेच लोकसभेत सांगितले आहे.
एवढी भयानक अवस्था आहे. तर लष्करात भरती होऊन देशाची सेवा करु पाहणा-या तरुणांना फक्त ४ वर्षाची सेवा व नंतर निवृत्ती अशी अग्निपथ नावाची योजना आणली आहे. या योजनेला तरुण वर्गांचा तीव्र विरोध आहे. काँग्रेस पक्ष तरुणांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. ही योजना केंद्र सरकारने मागे घ्यावी अशी काँग्रेस पक्षाची मागणी आहे.
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा
अतिवृष्टीमुळे विदर्भ, मराठवाड्यातील शेतक-यांचे व नागरिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांना तातडीने मदत द्यावी तसेच राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल बोलून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे वारंवार महाराष्ट्राचा व महापुरुषांचा अवमान करत असतात. मुंबईबद्दल बोलूनही त्यांनी मराठी माणसांचा अवमान केला आहे. कोश्यारी यांनी राज्यपाल पदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे. त्यांच्या बोलण्यातून भाजपा व आरएससची शिकवणच नेहमी दिसून येते.
उद्या सकाळी ११ वाजता राजभवनाला घेराव
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत उद्या सकाळी ११ वाजता हँगिंग गार्डन ते राजभवन असा मोर्चा काढून राजभवनला घेराव घातला जाईल. त्यानंतर जेलभरो केले जाणार आहे. राज्यात सर्व जिल्हा मुख्यालयी स्थानिक नेते आमदार, खासदार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होऊन केंद्र सरकारच्या विरोधात आवाज उठवतील.