नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी एबीने आज चौकशीसाठी बोलावले असून हा मोदी सरकारच्या दडपशाहीचा नववा अवतार आहे, असा आरोप करीत काँग्रेसने आज संसदेपासून सडकेपर्यंत दिल्ली दणाणून सोडली.
संसदेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, विरोधी पक्षनेत्यांना खोट्या आरोपाखाली चौकशी करून त्रास देण्याचे मोदी सरकारचे कारस्थान नवे नाही. आता याचाही अतिरेक होत असल्याने आता देशाची जनताच या सरकारला २०२४ मध्ये सत्तेवरून खेचून निषेध करेल. महागाई आणि बेरोजगारीसारख्या समस्यांत सामान्य जनता होरपळत आह असेही खरगे यांनी सांगितले.
दरम्यान आज सकाळी संसदेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर काँग्रेस खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. अनेक विरोधी पक्ष खासदारांनीही सरकारच्या दडपशाहीचा निषेध म्हणून याठिकाणी हजेरी लावली.
दुपारी बाराच्या सुमारास लोकसभा आणि राज्यसभेतील काँग्रेस खासदार गांधी पुतळ्याजवळ एकत्र जमले. त्यांनी तेथून संसदेच्या प्रवेशद्वारापर्यंत पदयात्रा काढली. तानाशाही नही चलेगी, सरकार हाय हाय अशा घोषणा देण्यात आल्या.