मुंबई : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भगवद्गीता आणि कुराण हातात घेऊन एक व्हिडीओ जाहीर केला आहे. जो गुन्हा मी केलाच नाही, त्याची शिक्षा मी का भोगू? असा सवाल करत, बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याचा कट असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. त्याचसोबत, जर कायद्याचा दुरूपयोग होणार असेल तर, मीही कायदा हातात घ्यायला तयार असल्याचा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, ज्या महिलेने माझ्यावर ३५४ चा गुन्हा दाखल केला ती महिला सध्या खुलेआम फिरत आहे. पोलीस या महिलेवर कोणतीही कारवाई करत नाही जर पोलिसांना याबाबत विचारलं तर वरून दबाव असल्याचं ते सांगत आहेत. आता या सर्वांनी एक नवीन षडयंत्र रचला आहे. माझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत आणि हे प्रयत्न ज्यांनी विनयभंगाचा माझ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी केले तेच करत असल्याचे समोर आला आहे.
३५४ चा गुन्हा मी कधीही खपवून घेणार नाही. माझ्यावर कोणताही गुन्हा दाखल केला असता तरी चाललं असते. परंतु जे कृत्य मी केलं नाही त्याची शिक्षा देखील मी भोगणार नाही. आज हातामध्ये गीता आणि कुराण सोबत घेऊन मी सर्व माझ्या मतदारांना सांगत आहे. जी महिला सध्या फिरत आहे. तिला कसलीही भीती नाही पोलीस तिला अटक करत नाहीत. त्यामुळे पोलीस जे करू शकत नाही ते तर माझ्या हातून घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर याचे राजकीय पडसाद उमटले होते. आव्हाड यांनी दाखल झालेल्या या गुन्ह्याविरोधात आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंब्रा-कळवा परिसरात आंदोलन केले होते. आव्हाड यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा हा राजकीय सूडबुद्धीने दाखल केला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आला. आव्हाड यांना कोणताही गुन्हा केला नसल्याचे सांगताना त्यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी कारवाईवर प्रश्न उपस्थित केले होते.