मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संजय राऊतांनी घेतलेली मुलाखत चांगलीच चर्चेत आली आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर चांगलेच तोंडसुख घेतले. मनातील अनेक खंत बोलून दाखवत आरोपांच्या फैरी झाडल्या. दरम्यान, संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याच्या आरोपावर उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला. राऊतांच्या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनीही केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला.
केंद्रीय तपास यंत्रणेबद्दल काही वेळेला न्यायालयाने सुद्धा आपली मते नोंदवलेली आहेत. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी नुकतेच सांगितले आहे की, त्यांच्या एका महत्त्वाच्या नेत्याला अटक होण्याची शक्यता आहे. मनीष सिसोदियांना खोट्या आरोपाखाली अटक होण्याची शक्यता आहे. कालांतराने त्यातून ते सुटतील. पण तोपर्यंत त्यांचे आयुष्य तुम्ही बरबाद केलेले असते.
असे कुणाचे आयुष्य बरबाद करून कुणाला सुख मिळेल असे मला वाटत नाही. असे लोक कधी सुखात राहू शकतात यावर माझा विश्वास नाही. देशात लोकशाही आहे. तुम्ही काय बोलायचे ते बोला, आम्ही काय बोलायचे ते बोलू. मात्र आता ज्या पद्धतीने बदनामीकरण चाललेले आहे, ते अत्यंत घाणेरड्या आणि विकृत भाषेत चाललेले आहे. हे लाभणार नाही कुणाला. जे विरोधी पक्षात आहेत त्यांच्यावर आरोप करायचे, त्यानंतर त्यांना कुंभमेळ्याला न्यायचे.
नितीन गडकरी मागे बोलले होते की आमच्याकडे वॉशिंग मशिन आहे. ज्या लोकांवर आरोप होते ते लोक त्यांच्यामध्ये गेले आहेत. त्या लोकांचे पुढे काय होते तेही सोडून द्या. पण नवीन नवीन लोकांना त्रास द्यायचा हे चांगल्या सशक्त राज्यकर्त्याचे लक्षण नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्ला चढवला.