औरंगाबाद : औरंगाबादेत कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे आता खबरदारीचा उपाय म्हणून तब्बल वर्षभरानंतर पालिकेच्या ४१ आरोग्य केंद्रांत कोरोना चाचण्या होणार आहेत. ५ आरोग्य केंद्रांतील ऑक्सिजन व्यवस्थेची तपासणी केली जात आहे.६५५ खाटा तयार ठेवण्याच्या सूचना आरोग्य केंद्रांना देण्यात आल्या आहेत.
वाळूज महानगरात बजाजनगरातील सिडकोत कोरोनाचा रुग्ण आढळून आला. जिल्हा परिषद आरोग्य विभागाने रुग्णाचा आरटीपीसीआर स्वॅब तपासणीसाठी पाठवला आहे. खासगी डॉक्टरांच्या मार्गदर्शनात रुग्णाला होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.
शहरात एकही रुग्ण नाही
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने दक्षता घेण्याची सूचना स्थानिक प्रशासनांना केली आहे. मंदिरात दर्शनासाठी येणा-या भाविकांना मास्कची सक्ती केली आहे. औरंगाबाद शहरात सध्या एकही रुग्ण नाही. पण, बजाजनगरात ३९ वर्षीय रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे. सध्या कोरोना संसर्गाची साथ आलेली नाही. परंतु सार्वजनिक ठिकाणी दक्षता बाळगावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
पालिकेच्या आरोग्य केंद्रात चाचणी
पालिकेच्या मेल्ट्रॉन, नेहरूनगर, आयओसी, पद्मपुरा, सिडको एन-८ आणि एन-११ या ५ आरोग्य केंद्रांत कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनच्या ६५५ खाटा उपलब्ध आहेत. रुग्णांच्या बेडला जोडलेल्या लाईनमधून ऑक्सिजन येतो किंवा नाही याची तपासणी करावी, असे पत्र या केंद्रांना पाठवण्यात आले आहे. पालिकेच्या सर्व ४१ आरोग्य केंद्रांमध्ये सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत अँटिजेन आणि आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे.
नागरिकांनी घाबरू नये
नागरिकांनी घाबरू नये, पण काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदचे आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांनी केले आहे. गर्दीच्या व अति जोखमीच्या ठिकाणी लहान मुले व ज्येष्ठांना पाठवू नये. आरोग्य विभागाने प्रतिबंधित लसीकरण करावे. टेस्ंिटग, ट्रॅकिंग, ट्रीटमेंट, व्हॅक्सिनेट व कोरोनापासून सुरक्षित राहण्याचे उपाय या पंचसूत्रीवर भर देण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.