परिसर सील, संबंधित घरातील व्यक्ती झाल्या होमक्वारंटाईन
रेणापूर : तालुक्यातील पानगाव येथील एक इंजिनिअर असलेला युवक मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे लक्षात आल्यामुळे पानगाव येथे आला होता. दोन दिवसांपूर्वी अस्वस्थ वाटत असल्याने तपासणी केली असता शनिवार दि.१८ रोजी त्याचा अहवाल पाझिटिव्ह आला़ त्यानंतर पानगाव येथील त्यांच्या घराचा परिसर सील करण्यात आला़ घरातील व्यक्तींना होमक्वारंटाईन केले आहे. तर पानगाव येथे कार्यरत असलेल्या एका पोलिसाच्या पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
पानगाव मध्ये मे महिन्यात मुंबई येथून आलेले दोन व्यक्ती पॉझिटिव्ह निघाले होते़ उपचारानंतर त्यांचा अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर पानगावकरांनी सुटकेचा श्वास सोडला होता. मुंबईमध्ये नोकरीच्या निमित्ताने राहत असलेला इंजिनिअर युवक लॉकडाऊन झाल्यावर मार्च महिन्यामध्ये पानगाव येथे आला होता. पानगाव येथून कामानिमित्त लातूर येथे राहात असलेल्या मोठ्या भावाच्या घरी जाणे येणे होते. तीन चार दिवसांपूर्वी प्रकृती बरी नसल्याने लातूर येथे तपासणी केली असता शनिवारी दि.१८ रोजी अहवाल पॉझिटीव्ह आल्याने त्यांच्या परिवारातील व्यक्तींना होम क्वारंटाईन केले आहे़ तर त्यांच्या घराचा परिसर सील करण्यात आला आहे.
कोरोनाबाधीत परिसरात जाऊन वैद्यकीय अधिकारी डॉ. यशवंत दहीफळे व आरोग्य कर्मचाºयानी भेट देऊन आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या़ यावेळी रेणापूरचे तहसीलदार राहूल पाटील, गटविकास अधिकारी मोहन अभंगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नारायण देशमुख पोलिस निरीक्षक गोरख दिवे, पोलिस कॉ.आनंद कांबळे, साजीद शेख, सरपंच सुकेश भंडारे, ग्रामसेवक गोपीनाथ टकले, मंडळ अधिकारी नेटके ए. आर. , तलाठी कमलाकर तिडकेआदीनी भेट दिली आहे.
पोलिस दूरक्षेत्र पानगाव येथे कार्यरत असलेल्या एका पो.हे.कॉ.च्या पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्या पोलिसाचा स्वॅब तपासणीला दिला आहे. पानगाव येथे कार्यरत असलेल्या पोलिसांनी त्या पोलिसांचा अहवाल निगेटीव्ह यावा म्हणून पोलिस कर्मचा-यांच्या संपर्कात आलेल्यांनी देव पाण्यात ठेवले आहेत.
Read More काँग्रेस नेते अस्लम शेख यांना कोरोनाची लागण