अमेरिकन वैज्ञानिकाचा गौप्यस्फोट
वुहान लॅबसोबत काम केल्याचा दावा
वॉशिंग्टन : चीनच्या वुहान लॅबमध्ये जवळून काम करणा-या एका वैज्ञानिकाने कोविड विषाणूच्या उत्पत्तीबाबत मोठा खुलासा केला असून, कोविड विषाणू जेनेटिकली इंजिनिअर्ड होता, असा दावा केला आहे. वुहान लॅबमधूनच हा व्हायरस लीक झाल्याचेही त्यांनी सांगितले.
वुहान इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजीमधून हा विषाणू लीक झाल्याचा आरोप इकोहेल्थ अलायन्सचे माजी व्हाईस प्रेसिडेंट डॉ. अँड्रयू हफ यांनी केला आहे. कोरोना महासाथीच्या सुरुवातीपासूनच अमेरिकन प्रशासन या विषाणूसाठी चीनला जबाबदार धरत आहे. मात्र, चीनने नेहमीच हे आरोप फेटाळून लावले आहे.
या लॅबला अमेरिकन सरकारकडून मोठ्या प्रमाणात फंडिंग मिळाले होते. इकोहेल्थ अलायन्स आणि परदेशी प्रयोगशाळांमध्ये योग्य जैवसुरक्षा आणि जोखीम व्यवस्थापनासाठी पुरेसे नियंत्रण उपाय नव्हते. याचा परिणाम म्हणून वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या प्रयोगशाळेतून हा धोकादायक विषाणू पडला, असा दावा हफ यांनी आपले पुस्तक द ट्रुथ अबाऊट वुहान या पुस्तकातून केला आहे.
डॉ. हफ यांनी २०१४ ते २०१६ पर्यंत इकोहेल्थ अलायन्समध्ये काम केले आहे. २०१५ मध्ये त्यांना या कंपनीचे उपाध्यक्ष बनवण्यात आले. अमेरिकन सरकारचे शास्त्रज्ञ म्हणून ते या संशोधन कार्यक्रमावर गुप्तपणे काम करत होते. ते म्हणाले की, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या निधीतून इकोहेल्थ अलायन्स १० वर्षांहून अधिक काळ वटवाघुळांमध्ये आढळणा-या विविध प्रकारच्या कोरोना विषाणूंचा अभ्यास करत आहे. हे काम करत असताना त्यांचे आणि चीनच्या वुहान लॅबमध्ये खूप जवळचे नाते निर्माण झाले होते.
चीनला कोरोनाबाबत माहिती होती
कोरोना विषाणू जेनेटिकली इंजिनिअर्ड विषाणू आहे, हे चीनला पहिल्या दिवसापासून माहित होते. बायोटेक्नॉलॉजीच्या हस्तांतरणासाठी अमेरिकन सरकारही दोषी आहे, असा दावा त्यांनी केला आहे. द सनशी बोलताना डॉ हफ म्हणाले की, त्यांनी जे पाहिले ते पाहून भीती वाटली. आम्ही त्यांच्याकडे जैविक शस्त्रांचे तंत्रज्ञान सुपूर्द केले. काही लोभी शास्त्रज्ञांनी जगभरातील लाखो लोकांचा बळी घेतला, असेही ते म्हणाले.