नाशिक : दोन वर्षांपूर्वीच संसाराला सुरुवात करून प्रपंच नेटका चालवणा-या एका दाम्पत्याला परिस्थितीच्या ओघात आर्थिक समस्यांनी ग्रासले. त्यातच घेणेक-यांनी दमदाटी करून पैशांसाठी तगादा लावला. त्यातच घेणेक-यांच्या धमक्या यामुळे आर्थिक विवंचनेत फसलेल्या दोघांनीही राहत्या घरात गळफास घेत जीवनाचा दोर कायमचा कापला.
पाथर्डी फाटा परिसरातील एका आलिशान सोसायटीत ही घटना घडली. गौरव जितेंद्र जगताप (वय २९) आणि नेहा गौरव जगताप (२३) अशी मृत पती-पत्नीची नावे असून, त्यांच्या ‘सुसाईड नोट’मुळे शहरात खळबळ उडाली आहे. पाथर्डी फाटा परिसरात असलेल्या अनमोल नयनतारा गोल्ड या सोसायटीमध्ये जगताप दाम्पत्य स्वत:च्या मालकीच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास होते.
रविवारी रात्री नऊ वाजता जगताप यांच्या मावशी चित्रा यांनी नेहाला फोन केला. परंतु, नेहा फोन उचलत नसल्याने मृत गौरवचा भाऊ यशला त्यांच्या घरी पाठविण्यात आले. घराचा दरवाजा कोणी उघडत नसल्याने भाऊ यश व काका अरुण गवळी यांनी सोसायटीतील इतरांच्या मदतीने दरवाजा तोडला. त्यानंतर घरात गौरव आणि नेहा यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याचे उघड झाले.
घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय बांबळे, सहायक निखिल बोंडे व हवालदार किशोर देवरे दाखल झाले. मृत गौरव अंबड एमआयडीसीतल्या एका खासगी कंपनीत नोकरी करायचा. गौरव आणि नेहा यांचा दोन वर्षांपूर्वीच प्रेमविवाह झाला होता.