27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeरडीचे रणांगण!

रडीचे रणांगण!

एकमत ऑनलाईन

कोरोना महामारीचे अवचित संकट जगाला, संपूर्ण मानवजातीला पुरते गोंधळून टाकणारे असल्याने त्याचा सामना करताना सुरुवातीला त्रेधातिरपीट उडणे साहजिक व नैसर्गिकच! जगभर हेच चित्र सर्वच देशांमध्ये पहायला मिळाले अगदी अत्यंत प्रगत, विकसित व तंत्रज्ञान-विज्ञानाच्या बाबतीत अग्रेसर वगैरे असल्याचा टेंभा मिरवणा-या देशांचीही झिंग कोरोनाने पुरती उतरवून टाकली़ आपल्या देशाबाबत बोलायचे तर आपण स्वातंत्र्य मिळवल्यापासून आजवर अशा भयंकर आरोग्य संकटाचा सामनाच केलेला नसल्याने ना राज्यकर्त्यांना, ना प्रशासनाला, ना जनतेला अशा संकटाचा अनुभव आहे, ना असे संकट हताळण्याचे ज्ञान! कौशल्य वगैरे तर लांबच, त्यावर बोलायलाच नको!

त्यामुळे अंधारात चाचपडत मार्ग शोधणे व इतर देशांच्या नेतृत्वाने चोखाळलेल्या, तज्ज्ञांनी सुचविलेल्या मार्गाचे अनुकरण करण्याचा पर्याय आपल्याकडे स्वीकारला जाणे, हेही साहजिक व मान्यच! त्याला आक्षेप असण्याचेही कारण नाहीच! त्यामुळे कोरोनाच्या प्रसाराचा वेग रोखण्यासाठी व या संकटाचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य यंत्रणेसह सर्वच यंत्रणा, प्रशासनाला सज्ज होण्यास अवधी मिळावा म्हणून देशात लागू करण्यात आलेला २१ दिवसांचा पहिला लॉकडाऊन मान्यच व देशातील जनतेनेही तो स्वीकारला! अर्थात तो लागू करण्याची धक्कातंत्री पद्धत व ती वापरताना राज्यकर्त्यांनी कुठलीही पूर्वतयारी न करणे, उद्भवणाºया परिस्थितीचा सारासार विचार न करणे, अंदाजही न बांधणे यावर आक्षेप असू शकतात!

Read More  आणखी अडीच हजार रेल्वेगाड्या सोडणार

सरकारने कितीही आकडेवारीचे जंजाळ उभे करून आपल्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले तरी देश चौथ्या टप्प्यात टाळेबंदी भोगत असताना जी वास्तविक स्थिती आज देशात आहे, ती लक्षात घेता हे आक्षेप योग्यच ठरतात! किंबहुना सरकार ६० दिवस देश कुलूपबंद करूनही जर कोरोनाच्या लढ्याची व त्या अनुषंगाने उद्भवलेल्या परिस्थितीत देशाच्या वाटचालीची दिशा ठरवू शकत नसेल, या दीर्घकालीन लढाईचे ठोस धोरण ठरवू शकत नसेल तर ‘बरेच काही चांगलेही घडतेय’, अशी कितीही भलावण झाली, शब्दच्छल केला गेला तरी राज्यकर्त्यांच्या आकलनशक्तीवर, कार्यक्षमतेवर, इच्छाशक्तीवर व एकंदर सकल दृष्टिकोनावर प्रश्नचिन्ह लागणे अपरिहार्यच आहे कारण त्यामुळे देशातील सरकारचे आदेश निमूटपणे पाळून प्रचंड सहनशीलता दाखवणारी सर्वसामान्य जनता त्यांचा काहीही दोष नसतानाही होरपळून निघते आहे, भरडली जाते आहे, प्रचंड त्रास सहन करते आहे!

त्यामुळे राज्यकर्त्यांना, प्रशासनाला आवडो की न आवडो प्रश्न उपस्थित होणार, जाब विचारला जाणार व उद्भवलेल्या परिस्थितीसाठीचे उत्तरदायित्वही ठरवले जाणार! हे अटळ आहे व लोकशाही व्यवस्थेमध्ये तो जनतेचा हक्क आहे़ तो हक्क कुणालाही नाकारता येणार नाहीच! असो!! मात्र, हा हक्क वापरण्याच्या नावावर जेव्हा जनतेचे हित बाजूला सारून पक्षीय हित जपण्यासाठी राजकारण सुरू होते तेव्हा मात्र, ‘ब्लेम गेम’, चिखलफेक सुरू होते व जनता वा-यावर पडते! राज्यात विरोधी पक्षात असलेल्या व केंद्रात सत्तेत असणा-या भाजपने तसेच केंद्रात विरोधक व राज्यात सत्ताधारी असणाºया काँग्रेससह इतर राजकीय पक्षांनी एकाच दिवशी एकमेकांविरुद्ध ‘ब्लेम गेम’ सुरू करावा याला निव्वळ योगायोग म्हणायचे की, देशातील राजकारणाच्या सध्याच्या स्थितीचा अटळ परिपाक?

Read More  हिंगोलीत एकाच दिवशी 50 कोरोनाबाधित वाढले

कोरोनाच्या संकटात विरोधी पक्ष म्हणून आम्ही सरकारसोबत आहोत, अशा भीमगर्जना अवघ्या ४०-४५ दिवसांतच हवेत विरून गेल्या आहेत आणि ज्या जनतेप्रति सर्वोच्च बांधीलकी असायला हवी (तशा आणाभाकाही दर मिनिटाला सर्वच राजकीय पक्षांकडून एका सुरात घेतल्या जातात) त्याच जनतेला, तिच्या हिताला वाºयावर सोडून सांदी-फटी शोधून हल्ले चढविण्याचे, एकमेकांना नाकर्ते ठरवण्याचे व स्वत:चे राजकीय हित जोपासण्याचे राजकारण आता पूर्ण रंगात आले आहे़ महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकारविरोधात सत्ता हातून निसटल्याने विव्हल झालेल्या फडणविसांच्या नेतृत्वात भाजपने थेट ‘मेरा आंगन, मेरा रणांगण’ म्हणत आंदोलन पुकारले तर त्याचवेळी सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या व्हीडीओ कॉन्फरन्समध्ये केंद्राच्या विशेष पॅकेजवर कडाडून हल्ला चढवत ते तकलादू व भ्रामक ठरवण्यात आले.

राज्यात सत्तेत असलेल्या आघाडीतील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भाजपने निष्क्रिय, अपयशी ठरवत राज्यातील गोरगरीब, सर्वसामान्य जनतेसाठी ५० हजार कोटींचे पॅकेज तातडीने जाहीर करावे, अशी मागणी केली तर केंद्रातील भाजप सरकारने देशातील प्रत्येक गरिबाला थेट मदत म्हणून त्यांच्या खात्यावर प्रत्येकी ७,५०० रुपये दरमहा सहा महिन्यांसाठी टाकावेत, अशी मागणी विरोधी पक्षांच्या बैठकीत करण्यात आली़ खरे तर भाजप व विरोधक या दोघांच्याही मागण्यांवर तत्काळ अंमलबजावणी झाली तर देशातल्या व राज्यातल्या सर्वसामान्यांसाठी तो ‘सुवर्णदिन’च ठरेल! मात्र, कोरोनापूर्वीच देशाच्या अर्थव्यवस्थेची तोळामासा स्थिती आता कोरोनानंतर तर चक्क ‘व्हेंटिलेटर’वर असताना हा सामान्यांसाठीचा ‘सुवर्णदिन’ उगवणार कसा? हा खरा प्रश्न आहे़ कुठलाच राजकीय पक्ष याचे उत्तर देत नाही़ फक्त एकमेकांकडे बोट दाखविण्यात धन्यता मानली जाते़ जर खरेच सर्व राजकीय पक्षांना जनतेचे भले करायचे असेल तर आंदोलनाचे स्टंट व आरोप-प्रत्यारोपांचे नाट्य बाजूला सारून हे सगळे एकत्रितरीत्या जनतेच्या भल्याचा मार्ग किमान कोरोनासारख्या महाभयंकर संकटात तरी का काढू शकत नाहीत? हाच खरा यक्षप्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला असणारच! असो!

Read More  मी राज्यपालांना वाकून नमस्कार केला कारण ..

राज्यात तर भाजपच्या आंदोलनाला सत्ताधारी आघाडीतील पक्षांकडून ‘महाराष्ट्रद्रोही भाजप’ आंदोलनाने चोख उत्तरही देण्यात आले व संकटाच्या काळात राजकारण करू नका, असेही बजावण्यात आले! ते अगदी योग्यच, त्याला आक्षेप असण्याचे कारण नाहीच! देशात सध्या जी स्थिती कोरोनाने निर्माण केली आहे, त्या स्थितीत राजकारण निषेधार्हच! त्यामुळे भाजपच्या या आंदोलनास जनतेनेही नाकारले! मात्र, हाच नियम आपापल्या राज्यात सत्ताधारी म्हणून कोरोनाचे संकट हताळण्यात चुका करणाºया व त्यावर पांघरूण घालण्यासाठी केंद्राकडे बोट दाखविणाºया विरोधी पक्षांनाही लागू होत नाही का? हा खरा प्रश्न! या प्रश्नाचे उत्तर सर्वच राजकीय पक्षांना जनतेला द्यावेच लागेल, त्यावेळी कुठल्याच पक्षाला ‘आपला तो बाळ्या, लोकाचं ते कार्टं, अशी भूमिका घेऊन स्वत:चे अपयश, चुका लपवता येणार नाहीतच! कारण कोरोना संकटाने आता लोकांचे संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलेय, आजवरचे सर्व निकष, गृहितके, संदर्भ, तर्क व कल्पनाही बदलून टाकल्या आहेत़ या वास्तवाचे भान ‘रडीच्या रणांगणा’चे खेळ रंगविणाºया राजकीय पक्षांना अद्याप आलेले दिसत नाही़ जनतेच्या हितासाठी व भल्यासाठी राजकीय पक्षांना लवकरात लवकर हे भान येणे आवश्यक आहे़ कोरोना संकट व त्या अनुषंगाने देशात निर्माण झालेले आर्थिक, सामाजिक अभूतपूर्व संकट यात जनता अक्षरश: होरपळून निघते आहे़ या स्थितीत राजकीय डाव रंगवण्याची नव्हे तर सर्वांनी एकत्रितरीत्या जनतेला व पर्यायाने देशाला वाचवण्यासाठी, प्रयत्न करण्याची गरज आहे़ हे भान न ठेवणा-यांना देशाची जनता व देशाचा इतिहास कधीच माफ करणार नाही, हे मात्र निश्चित!

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या