मुंबई : आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशीही अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध १० कंपन्यांपैकी ६ कंपन्यांचे शेअर्समध्ये लोअर सर्किट आहे. ज्या चार शेअर्समध्ये सर्किट नाही ते देखील घसरणीसह व्यवहार करत आहेत.
अदानी समूहाच्या समभागांवर नजर टाकली तर, अदानी एंटरप्रायझेसचा स्टॉक ८ टक्क्यांनी घसरला आहे आणि तो रु.१७०२ च्या पातळीवर व्यवहार करत आहे.
अदानी ग्रीन ५% घसरून ६८८ रुपयांवर, अदानी विल्मर ५% घसरून ४१४ रुपयांवर, अदानी ट्रान्समिशन ५% घसरून ११२७ रुपयांवर, अदानी पॉवर ५% घसरून १५६ रुपयांवर, अदानी टोटल गॅस ५% घसरून ११९ आला.
रेटिंग एजन्सी मूडीजने अदानी समूहाच्या कंपन्यांचे क्रेडिट आउटलुक कमी केले आहे, त्यामुळे अदानी समूहाच्या समभागात घसरण झाली आहे. कंपनीच्या बाँड पोर्टफोलिओमध्ये मोठ्या प्रमाणात तोटा होण्याची शक्यता आहे, त्यामुळे अदानी समूहाच्या शेअर्सवर हा दबाव दिसून येत आहे. शुक्रवारी, मूडीजने अदानी समूहाच्या आठ कंपन्यांचे मानांकन कमी केले आहे.
अदानी समूहाने महसूल वाढीचे लक्ष्य कमी केल्याने बाजाराचीही निराशा झाली आहे आणि त्यासोबत समूह भांडवली खर्च कमी करणार आहे. अदानी समूहाने आता पुढील आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी १५-२०टक्के महसूल वाढीचे लक्ष्य ठेवले आहे.
समूहाच्या भांडवली खर्चाच्या योजनेवर म्हणजेच कंपन्यांच्या विस्तार योजनेवर होणारा खर्च कमी करेल. आता समूहाला आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यावर कंपनीचे लक्ष असणार आहे.