नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक पार पडत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने विरोधीपक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना समर्थक दिलेले आहे. पण या दोन्ही पक्षांच्या प्रत्येकी एका आमदाराने आपण भाजपप्रणित एनडीएचे उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान केले आहे. यामुळे या निवडणुकीत क्रॉस वोटिंग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे गुजरातचे आमदार कंधल एस. जडेजा आणि ओडिशातील काँग्रेसचे आमदार मोहम्मद मुकीन यांनी एनडीचे उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मत दिल्याचे स्वत: सांगितले आहे. दरम्यान, सध्या एनडीचा भाग नसलेल्या विरोधीपक्षातील शिवसेना, बिजू जनता दल, वायएसआर काँग्रेस आणि तेलगू देसम पार्टी (टीडीपी) आदींनी एनडीएच्या मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला होता.
पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनीही दुस-या उमेदवाराला मत दिल्याने क्रॉस वोटिंग झाल्याचं स्पष्ट झाले आहे. दरम्यान, राष्ट्रपतीपदासाठी विरोधकांमध्ये सुरुवातीपासूनच बराच खल सुरु होता. पहिल्यांदा सर्वांनी राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांना राष्ट्रपतीपदासाठी पसंती दिली होती. परंतू या प्रस्तावाला पवारांनी नम्रपणे नकार देत आपल्याला अजूनही सक्रीय राजकारण करायचे असल्याने आपण उमेदवारी स्विकारु शकत नाही असे त्यांनी म्हटले होते.
त्यानंतर राष्ट्रपतीपदासाठी ममता बॅनर्जी यांनी विरोधकांकडून जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता. पण त्यांनीही सध्या जम्मू-काश्मीरला आपली गरज असल्याचे सांगत उमेदवारी स्विकारायला नकार दिला होता. त्यानंतर अखेर पूर्वश्रमीचे भाजपचे खासदार आणि मोदींवर टीका करत पक्षातून बाहेर पडलेले यशवंत सिन्हा यांच्या नवावर विरोधकांचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आले.