उदगीर : कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या सेवानिवृत्त शिक्षकामुळे उदगीर तालूक्यातील लोणी येथे आज संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. मृत शिक्षक यांच्या कुटूंबात 17 सदस्य आहेत तर अंत्यविधीसाठी सुमारे 50 ते 60 जण उपस्थित होते. त्यामुळे लोणीकरांची चिंता वाढलेली आहे.
Read More बेस्ट सेवेमधील १०० योध्यांची कोरोनावर मात
कोरोना रुग्ण शिक्षक हे 11 तारखेस उदगीर येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत तसेच धाराशिव जनता सहकारी बँकेच्या शाखेत गेल्याचे स्पष्ट झालेले आहे. त्यानंतर 16 तारखेस त्यांना ताप, सर्दी झाल्यामुळे उदगीर शहरातील एका रुग्णालयात उपचारासाठी ते गेले होते. 22 तारखेस दुपारी 12.30 वाजता ते शासकीय रुग्णालयात दाखल झाले आणि दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
शनिवारी रात्री त्यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आणि उदगीर तालूक्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली. उदगीर तालूक्यात कोरोनामुळे मृत्यू झालेली ही तिसरी घटना आहे. सोमवारी मृत शिक्षकाच्या कुटूंबीयांच्या स्वॅबची तपासणी करण्यात येणार असून ते पॉझिटीव्ह आल्यास इतरांचीही तपासणी केली जाणार आहे. लोणी येथे आज संचारबंदी लागू करण्यात आली असून त्यांचे घर सील केलेले आहे. गावात जाण्या येण्याचे सर्व रस्ते बंद करण्यात आलेले आहेत.