36.5 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeमहाराष्ट्रलसीकरण सुरू होताच सायबर चोर सक्रिय

लसीकरण सुरू होताच सायबर चोर सक्रिय

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात कोरोनायोद्ध्यांना ही लस दिली जाणार असून टप्प्याटप्प्याने सर्व नागरिकांचे लसीकरण होणार आहे. लसीकरण सुरू होताच सायबर चोरटेही सक्रिय झाले आहेत. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोणत्याही लस नोंदणीच्या भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.

अनिल देशमुख म्हणाले की, राज्यात कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. ही मोहीम केंद्रीय यंत्रणेकडून जिल्हा यंत्रणेमार्फत राबविली जात आहे. काही सायबर हल्लेखोर नागरिकांना फोन करून या लसीची नोंदणी करण्यासाठी मोबाईलवर आलेला ओटीपी, आधार क्रमांक, पिन कोड व इतर वैयक्तिक माहिती विचारत आहेत.

अशा प्रकारच्या भूलथापांना नागरिकांनी बळी पडू नये, तसेच आपली कोणतीही माहिती सामायिक करू नये, असे मी आवाहन करतो. तसेच या फोन कॉल्सची नजीकच्या पोलिस स्टेशनमध्ये आणि महाराष्ट्र सायबर विभागात तक्रार करावी. जेणेकरून पोलिस या सायबर हल्लेखोरांवर नियमांनुसार कठोर कायदेशीर कारवाई करतील, असे त्यांनी सांगितले आहे.दरम्यान, राज्यव्यापी लसीकरण मोहिमेची सुरुवात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते शनिवारी मुंबई महापालिकेच्या वांद्रे-कुर्ला संकुलामधील कोविड सुविधा केंद्रात झाली. मुंबईमधील एकूण ९ केंद्रांवरील ४० बूथवर लसीकरण केले जाणार आहे.

आपण आज क्रांतिकारक पाऊल टाकत आहोत. याबद्दल कुणाचेही दुमत असण्याची शक्यता नाही. हेच ते ठिकाण आहे जे कोरोना रुग्णांनी तुडुंब भरून वाहत होते. मात्र, जिवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांची सेवा करणाºयांना मी मानाचा मुजरा करतो. असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड योद्ध्यांबरोबरच मुंबई महापालिका प्रशासनाचेही अभिनंदन केले.

लस नोंदणीच्या नावाखाली फसवणूक
वास्तविक, सायबर क्राईमशी संबंधित या चोरट्यांनी बºयाच लोकांना बळीचा बकरा बनवले आहे. या प्रकरणांमध्ये लोकांच्या मोबाईलवर मेसेजद्वारे एक लिंक पाठवून त्यांना त्यावर क्लिक करण्यास सांगितले गेले होते. या मेसेजमध्ये असे लिहिले होते की, जेव्हा तुम्ही या लिंकवर क्लिक कराल तेव्हाच तुमची कोरोना लस नोंदणी पूर्ण होईल. पण, लोक या लिंकवर क्लिक करताच त्यांच्या खात्यातून आणि ई-वॉलेटमधून लगेच पैसे काढून घेण्यात आले. याव्यतिरिक्त बरेच लोक सरकारच्या वतीने लिंक जारी करून नोंदणीबाबत सांगत आहेत. लोकांना कोरोना लस मोफत देत असल्याचे सांगत सायबर फसवणुकीमध्ये अडकवले जात आहे. कोरोन लस मिळवून देण्याचे आमिष देऊन मोबाईलवर आलेला मेसेज ओटीपीसह पाठवण्यास सांगतात. जेव्हा तुम्ही या सायबर गुन्हेगाराला ओटीपी पाठवता, त्याक्षणी तुमच्या बँक खात्यातून पैसे डेबिट केले जातात.

अशा गुन्हेगारांना कसे टाळाल?
कायम लक्षात ठेवण्याची गोष्ट अशी की, कोविड लसीची नोंदणी आपल्या फोनवर मेसेजद्वारे किंवा कॉलद्वारे घेतली जाईल, अशी कोणतीही माहिती सरकारद्वारे जाहीर करण्यात आलेली नाही. आपल्या फोनवर आलेल्या अशा कुठल्याही मेसेजमधील लिंकवर क्लिक करू नका. जर कोणी आपल्याला कॉल केला आणि फोनवर पाठवलेल्या ओटीपीची माहिती विचारली, तर ती अजिबात देऊ नका. तसेच, जर कोणी तुम्हाला कोरोना लस देण्यासंदर्भात काही सांगत असेल तर, त्यावर विश्वास ठेवू नका. अशा सायबर क्राईमबद्दल लोकांना सतर्क ठेवणे आणि जागरूकता वाढवणे गरजेचे आहे.

तुमची मुलं तुमचे शब्द निवडताहेत …

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या