पुणे : निसर्ग चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवरून पुढे सरकल्यानंतरही मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये बुधवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पुणे जिल्ह्यात खेड तालुक्यात चक्रीवादळामुळे मायलेकाचा मृत्यू झाला आहे. वाहगाव येथील मंजाबाई नवले आणि नारायण नवले अशी मृत मायलेकाची नावं आहे. मंजाबाई यांचा काल मृत्यू झाला होता तर नारायण नवले यांचा गुरूवारी उपचार सुरू असताना मृत्यू झाला. इतर दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
पुणे जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे 57 अंगणवाडी, 31 जिल्हा परिषदेच्या शाळा आणि 4 ग्रामपंचायत कार्यालयांचं मोठं नुकसान झालं आहे. अनेक घरांवरील पत्रे उडून गेली आहेत. भिंतीला तडे घेते आहेत. शाळा आणि ग्रामपंचायत कार्यालयातील रेकॉर्ड आणि साहित्य पूर्णपणे भिजलं आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात चक्रीवादळाच्या थैमानात वीज यंत्रणा विस्कळीत झाली आहे.
Read More देशातील लॉकडाऊन बिनकामाचा ठरला- राहुल गांधी
अनेक ठिकाणी वादळात विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. पुण्यातील जवळपास 540 वीज वाहिन्यांचा वीजपुरवठा खंडीत झाल्याची माहिती मिळाली आहे. मुंबई, ठाणे आणि उपगरांमध्ये गुरुवारी पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. तर दक्षिण मुंबईत रिमझिम पाऊस आहे. दरम्यान आज मुंबईसह, ठाणे, उपनगर, पुणे, कोकण, नाशिक, उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.