मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे अनेक सणांवर निर्बंध लादण्यात आले होते. मात्र, यावर्षीचे सण हे निर्बंधमुक्त असणार असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. यानुसार, दहीहंडी आणि अनंत चतुर्दशी या सणाला सार्वजनिक सुटी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.
राज्य शासनाच्या निर्णयानुसार दरवर्षी दहीहंडी आणि अनंत चतुर्दशी या सणाला सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात येते. त्यानुसार, नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील दहीहंडी आणि अनंत चतुर्दशी या दिवशी सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. यावर्षी १९ ऑगस्ट २०२२ रोजी (शुक्रवार) दहीहंडी तर, ९ सप्टेंबर २०२२ रोजी (शुक्रवार) अनंत चतुर्दशी असणार आहे.
यंदा १९ ऑगस्ट रोजी दहीहंडी साजरी होणार आहे. या संदर्भात दहीहंडी सणाला राष्ट्रीय सण म्हणून घोषित करून शासकीय सुटी जाहीर करण्याची मागणी शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनी केली होती. यासाठी सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले होते. त्यानुसार, मुख्यमंत्र्यांनी मागणी मान्य करत सुटी जाहीर केली आहे.
दहीहंडी आणि गणेशोत्सवाला यंदा हिरवा कंदील
महाराष्ट्रात दहीहंडी आणि गणेशोत्सव हे सण मोठ्या उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून ब्रेक लागलेल्या दहीहंडी आणि गणेशोत्सवाला काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा कंदील दाखवला होता. त्यानुसार, यावर्षीचे पुढचे सण निर्बंधमुक्त साजरे करता येणार असल्याने भाविकांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण आहे.