संसार खाक, पती-पत्नीच्या भांडणातून संताप अनावर
भोपाळ : पती-पत्नीमध्ये तशी तर नेहमीच भांडणे होत असतात. अनेकदा ही भांडणे अत्यंत लहान स्वरुपाची असतात तर अनेकदा ती मोठ्या गुन्ह्यापर्यंत वाढतात. पण, पती-पत्नीच्या भांडणातून एखाद्या पतीने इतके नाराज व्हावे की त्याने थेट आपले अख्खे घर पेटवून टाकावे. तुम्हाला विश्वास बसत नसेल, पण हे खरे आहे. बरे याला काही खूप मोठे कारण नव्हते तर बायकोने आपल्याला न आवडणारी डाळ बनवली म्हणून या पतीने हा कारनामा केला.
ही घटना मध्य प्रदेशातील उज्जैन येथे घडली. मीडिया रिपोर्टसनुसार रविवारी पत्नीने पतीसमोर जेवणाचे ताट वाढले. तेव्हा जेवणात डाळ पाहून पतीला राग आला आणि त्याने पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतरही त्याचा राग शांत झाला नाही, त्याने संपूर्ण घरात रॉकेल ओतले आणि अख्खे घर पेटवून दिले. हे संपूर्ण प्रकरण नानाखेडा परिसरातील असून रात्री १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. पती कामावरून घरी परतल्यानंतर जेव्हा तो जेवायला बसला, त्यानंतर हे सगळे प्रकरण घडल्याची माहिती आहे.
पती रात्री कामावरुन घरी आला. त्यानंतर पत्नीने त्याच्यापुढे जेवणाचे ताट वाढले. त्यात त्याला डाळ दिसली. त्याला डाळ अजिबात आवडत नाही, हे माहिती असूनही पत्नीने त्याला डाळ वाढली म्हणून तो रागावला. त्यानंतर त्याने पत्नीशी भांडण केले, तिला मारहाणही केली. मात्र, त्याचा राग काही शांत झाला नाही. रागाच्या भरात त्याने आपलेच राहाते घर पेटवून दिले. त्यानंतर तो घराबाहेर पडला. आसपासच्या लोकांना जेव्हा ही घटना कळाली तेव्हा त्यांनी ही आग विझवली.