25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रगोगलगाईंमुळे नुकसान, राज्य सरकारकडून ९८ कोटींची मदत जाहीर

गोगलगाईंमुळे नुकसान, राज्य सरकारकडून ९८ कोटींची मदत जाहीर

एकमत ऑनलाईन

शंखी गोगलगायींमुळे शेतीचे नुकसान, लातूर, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यांतील शेतक-यांना मिळणार लाभ
मुंबई : लातूर, उस्मानाबाद व बीड या ३ जिल्ह्यांत शंखी गोगलगायींमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाल्याने शासनाने तातडीने उपाययोजना करत ९८ कोटी ५८ लाख रुपयांच्या मदतीस मंजुरी दिली. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या विविध नैसर्गिक आपत्तींमध्ये पेस्ट अटॅक म्हणजे किटकांचा हल्लाही अंतर्भूत आहे. त्यानुसार गोगलगायींचा उपद्रव हा पेस्ट अटॅक असल्याने बाधित शेतक-यांना तातडीने मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य मंत्रिमंडळाने घेतला. त्यामुळे गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांनाही आता मदत मिळणार आहे.

लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यांत शंखी गोगलगायीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून ९८ कोटी ५८ लाख इतका निधी वितरीत करण्यासाठी मंजुरी देण्यासंदर्भात अधिसुचना जारी करण्यात आली. त्यानुसार विभागीय आयुक्तांना आदेश देण्यात आले आहेत. शेतक-यांना मदत देण्यासंदर्भात एनडीआरएफच्या निकषांमध्ये बदल करून दुप्पट दराने मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला, याच निर्णयाच्या अनुषंगाने गोगलगायींमुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात वाढीव दर निर्धारित करण्यात आले आहेत.

मदत वाटपात पारदर्शिता बाळगण्यासाठी पंचनामे करण्यात आल्यानंतर लाभार्थी निश्चित करण्यात यावेत, लाभार्थ्यांना थेट ऑनलाईन पद्धतीने मदत हस्तांतरित करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यासंदर्भातही सूचना देण्यात आल्या आहेत. गोगलगायींमुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेली शेतीपिके, फळपिकांच्या नुकसानीसाठी ३ हेक्टरपर्यंत ही नुकसानभरपाई मिळणार आहे.

१ लाख १८ हजार
शेतक-यांना मदत
तीन जिल्ह्यांमधील सुमारे १ लाख १८ हजार ९९६ शेतक-यांना या योजनेतून मदत मिळणार आहे. गोगलगायींमुळे एकूण ७२ हजार ४९१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्याचा शेतक-यांना फार मोठा फटका बसला होता. याची दखल घेऊन राज्य शासनाने मदतीची घोषणा केली. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतक-यांना दिलासा मिळणार आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या