बोर्डी : कडाक्याच्या थंडीमुळे झाडावरच चिकू फळ पिकण्याचे प्रमाण वाढल्याने बागायतदारांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पुढचे चार-पाच दिवस आणखी गारठा वाढेल, असा अंदाज कोसबाड कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ विलास जाधव यांनी व्यक्त केल्यामुळे शेतक-यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात चिकू फळांचा हंगाम मोठ्या प्रमाणात असतो. चालू वर्षी थोडासा उशिरा हंगाम सुरू झाला. सुरुवातीच्या काळात वातावरण अनुकूल असल्यामुळे फळांची उत्तम वाढ झाली होती. मात्र मागच्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी सुरू झाल्याने चिकूची फळे झाडावरच अकाली पिकण्याचे प्रमाण वाढले आहे.
मागच्या दोन दिवसांपासून डहाणू तालुक्यात पारा १२ अंशांच्या खाली आला आहे. तसेच चालू वर्षी पावसाळी हंगामात चार महिने चिकूचा बहर नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. त्यातच आता थंडीचा तडाखा बसल्यामुळे झाडाखाली पिकलेल्या चिकूंचा सडा पडला आहे. डहाणू तालुक्यात सुमारे सात ते आठ हजार एकर जमीन क्षेत्रावर चिकूची लागवड आहे.