पूर्णा : पूर्णा तालुक्याला अवकाळीचा तडाखा बसल्याने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी वरिष्ठ अधिका-यांसह तालुक्याचा दौरा केला. यावेळी शेकडोंच्या संख्येने उपस्थित शेतक-यांनी डोळ्यात पाणी आणून आपल्या नुकसानीचा पाढा आ.डॉ.गुट्टे यांच्या समोर वाचला. यावेळी संबंधित अधिका-यांना तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश आ.डॉ.गुट्टे यांनी दिले आहेत.
पूर्णा तालुक्यातील आव्हई, बरबडी आणि सुहागण या गावांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. पावसात मोठमोठ्या गारपीटीचा फटका बसल्याने ज्वारी, गहू, ऊस या प्रमुख पिकांसह केळी कांदा, मिरची, शेवगा खरबूजाचे अतोनात नुकसान झाले आहे. ऊसाच्या नळ्यात आळ्या पडल्या आहेत. तर ज्वारी आणि गहू आडवा पडला आहे. त्यामुळे आ.डॉ.गुट्टे यांनी सर्व नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली.
राज्यातले सरकार शेतक-यांच्य पाठीशी खंबीरपणे उभे आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त सर्व भागाची पाहणी करण्याचे आदेश जिल्हाधिका-यांना सुध्दा शासनाने दिले आहेत. आपल्याही भागांमध्ये झालेले नुकसान मोठे आहे. त्यामुळे पंचनामे झाल्यानंतर सर्व नुकसानग्रस्त शेतक-यांना शासनाच्या वतीने योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करतो. तसेच घाबरू नका, कोणत्याही संकटात मी तुमच्या पाठीशी आहे, अशा शब्दात आ.डॉ.गुट्टे यांनी उपस्थित शेतक-यांना धीर दिला.
यावेळी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, पूर्णा तहसीलदार माधव बोथीकर, मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हादराव मुरकुटे, तालुका अध्यक्ष गणेश कदम, संदीप माटेगावकर, जगन्नाथ रेनगडे, सुदाम वाघमारे, सुभाषराव देसाई, नवनाथ भुसारे, शिवाजी आवरगंड, मारुती मोहिते, पशुपती शिराळे यांच्यासह संबंधित सर्व प्रशासकीय अधिकारी, सरपंच, ग्रामस्थ आणि नुकसानग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.