नवी दिल्ली : आयपीएल सीझन १५ आता अंतिम टप्प्याच्या मार्गावर आहे. यंदाच्या या आयपीएल महाकुंभात अनेक युवा खेळाडूंनी संधीचे सोने करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अशातच बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दोन गोलंदाज लवकरच टीम इंडियाच्या ताफ्यात दाखल होणार असल्याचे संकेत दिले आहेत.
आयपीएलनंतर टीम इंडिया १० दिवसांनंतर साऊथ आफ्रिकाविरुद्ध भारतातच ५ सामन्यांची टी-२० इंटरनॅशनल सीरिज खेळणार आहे. भारत आणि आफ्रिकेमध्ये ९ जून ते १९ जूनपर्यंत टी-२० सीरिज खेळवण्यात येणार आहे. अशातच सौरव गांगुली यांनी टीम इंडियाला दिलासादायक माहिती दिली आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत गांगुली म्हणाले, असे किती गोलंदाज आहेत जे १५० कि.मी. प्रतितास वेगाने गोलंदाजी करू शकतात? असा सवाल उपस्थित करत जर उमरान मलिकची निवड टीम इंडियासाठी झाली तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही.
उमरान मलिक सर्वांत वेगवान आहे. आम्हाला त्याचा वापर खूप सावधगिरीने करावा लागणार आहे. असे सांगत ते म्हणाले, मला कुलदीप सेनदेखील पसंत आहे. यासोबत टी. नटराजननेदेखील पुनरागमन केले आहे.
तसेच, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह हेदेखील टीम इंडियाच्या ताफ्यात असतीलच. मी आपल्या वेगवान गोलंदाजांच्या कामगिरीने खूप खुश आहे. आयपीएल १५ व्या सीझनमध्ये उमरान मलिकने १५७ कि.मी. प्रतितास वेगाने गोलंदाजी केली आहे.
आफ्रिकेविरुद्ध खेळल्यानंतर टीम इंडिया ब्रिटन दौ-यावर जाणार आहे. २६ जून ते २८ जूनपर्यंत आयर्लंडविरुद्ध दोन सामन्यांची टी-२० सीरिज खेळणार आहेत. टीम इंडिया जुलैमध्ये इंग्लंडविरुद्ध १ टेस्ट, ३ वनडे आणि ३ टी-२० मॅच खेळणार आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे रद्द झालेली पाचवी कसोटी पूर्ण करण्यासाठी भारत ही एकमेव कसोटी खेळणार आहे.