नाशिक : नाशिक जिल्ह्यातल्या नांदगाव तालुक्यातील बोलठाण परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. मात्र या मुसळधार पावसात महिलेसह दोन मुली बैलगाडीने घरी परतत असताना बैलगाडी उलटून तिघीही वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोघींचा मृत्यू झाला असून एका मुलीचा शोध सुरू आहे.
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात २४ जून रोजी पावसाने जोरदार हजेरी लावत शेतक-यांना दिलासा दिला. बोलठाण परिसरात शेतकरी घरी परतत असताना बैलगाडीत बसलेल्या एका मजूर महिलेसह दोन चुलत बहिणी वाहून गेल्या आहेत. यापैकी शेतमजूर महिलेसह एका मुलीचा मृतदेह सापडला असून दुस-या मुलीचा शोध घेतला जात आहे.
नांदगाव तालुक्यातील जातेगाव परिसरात काल दुपारी मुसळधार पाऊस झाला. यावेळी आडगाव (ता. कन्नड, जि. औरंगाबाद) येथील शेतमजूर काम आटोपून घराकडे निघाले होते. यावेळी जातेगावजवळील खारी नदीच्या मार्गातून घरी जात असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. शेतमजुरांना पाण्याचा अंदाज न आल्याने बैलगाडी पाण्यात उलटली. या पाण्याच्या प्रवाहात सापडलेल्या पाच मजुरांची कशीबशी सुटका करण्यात आली. परंतु मीनाबाई बहिरव, साक्षी सोनवणे, पूजा सोनवणे या पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेल्या.