पुणे : काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना ३० लाख रुपये खंडणी न दिल्यास गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी एका अज्ञात व्यक्तीने दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
गेल्या काही दिवसांत शहरातील काही प्रमुख राजकीय व्यक्तींना खंडणीसाठी धमकीचे फोन येत आहेत. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
या संदर्भात अविनाश रमेश बागवे (रा.भवानी पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश बागवे यांना चार एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता आणि सायंकाळी सहाच्या सुमारास एका व्हॉट्सअॅप कॉलवरून ३० लाख रुपये खंडणीची मागणी करण्यात आली.
पैसे न दिल्यास गोळ्या घालून ठार मारू तसेच राजकीय जीवन उद्ध्वस्त करू, असा मेसेजही पाठविला. त्यानंतर बागवे यांनी समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वीच माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या मोबाईल क्रमांकाचा गैरवापर करून एका बिल्डरकडे तीन कोटींची खंडणी मागण्यात आली होती.
या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यानंतर भाजपचे माजी नगरसेवक गणेश बीडकर यांनाही २५ लाख रुपयांच्या खंडणीसाठी धमकी दिल्याचा प्रकार घडला. तसेच, यापूर्वी मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्या मुलालाही बनावट मॅरेज सर्टिफिकेट व्हायरल करण्याची धमकी देत खंडणीची मागणी केल्याचा प्रकार घडला आहे. व्हॉट्सअॅप कॉल करण्यासाठी गुन्हेगारांकडून चोरीचे मोबाईल सिमकार्ड वापरण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे