26.8 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeराष्ट्रीयकर्ज पुन्हा महागणार!

कर्ज पुन्हा महागणार!

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : महागाईचा उसळलेला आगडोंब शमविण्यासाठी रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढीचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे जून महिन्यात पुन्हा एकदा व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे. असे संकेत खुद्द आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिले. जूनमध्ये रिझर्व्ह बँकेच्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीची बैठक आहे. यामध्ये देशातील वाढत्या महागाईवर उपाययोजना केल्या जाणार असल्याचे शक्तीकांत दास म्हणाले. तसेच डॉलरच्या तुलनेत रुपयांची होणारी घसरण थांबवण्यासाठी आरबीआय प्रयत्नशील असल्याचेही शक्तीकांत दास म्हणाले.

वाढती महागाई रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने काही दिवसांपूर्वी रेपोदरात अचानक ०.४ टक्क्यांची वाढ केली. आगामी द्वैमासिक पतधोरण निश्चित करतानादेखील पुन्हा दरवाढीचा निर्णय घोषित होणे अटळ असेल, असे मत विश्लेषकांनी व्यक्त केले होते. बँकेची पतधोरण बैठक जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. किरकोळ महागाईचा एप्रिलमधील दर व वाढते इंधनदर पाहता या बैठकीत पुन्हा एकदा रेपोदरात वाढ करण्याची दाट शक्यता आहे.

व्याजदर वाढ झाल्यास बँकांकडूनदेखील कर्जदर वाढवले जातील. त्यामुळे नजीकच्या काळात सर्वच प्रकारची कर्जे महागण्याची शक्यता आहे. त्याशिवाय ज्यांनी कर्ज घेतलेली आहेत, अशा कर्जदारांचे मासिक हप्तेदेखील (ईएमआय) वाढण्याची शक्यता आहे.

या मुलाखतीत दास यांनी व्याजदर वाढ होणार असल्याचे म्हटले आहे. मात्र नेमका किती टक्क्याने व्याजदर वाढेल, याबाबत त्यांनी स्पष्टता करणे टाळले. ते म्हणाले की रेपो जर कदाचित ५.१५ टक्के या कोविडपूर्व पातळीपर्यंत जाऊ शकतो, असे ते म्हणाले. आरबीआयकडून आपल्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या बैठकीत रेपो दरात २५ ते ३५ टक्क्यांची वाढ होऊ शकते. सध्याचा रेपो दर हा ४.४० इतका असून तो ४.७५ टक्क्यांपर्यंत नेण्याचा विचार आरबीआयकडून केला जाऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. जूनच्या पतधोरणात बँकेकडून महागाईबाबतचा सुधारित अंदाज सादर केला जाईल, असे दास यांनी सांगितले.

महागाई दर कमी होणार
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केल्याबाबत दास यांनी भाष्य केले. या शुल्क कपातीने देशभरात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले आहे. यामुळे महागाईचा दर ०.२० टक्क्यानी कमी होईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या