23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeफडणवीसांकडून विजय जगतापांना समर्पित

फडणवीसांकडून विजय जगतापांना समर्पित

एकमत ऑनलाईन

पिंपरी: राज्यसभा निवडणुकीतील भाजपचा विजय हा लढवय्ये आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांना समर्पित आहे, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही आमदारांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.आमदार जगताप यांची प्रकृती हे गेल्या दोन महिन्यांपासून नाजूक आहे. जवळपास दीड महिन्यांच्या उपचारानंतर गेल्या आठवड्यात त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. अजूनही ते पूर्णपणे बरे झालेले नाहीत व घराबाहेरही पडत नाहीत. त्यांना भेटण्याची कोणालाही परवानगी नाही.

अशा परिस्थितीतही फडणवीस यांच्या विनंतीनुसार आणि डॉक्टरांच्या संमतीने जगताप यांनी रूग्णवाहिकेतून मुंबईला जाऊन राज्यसभा निवडणुकीतील मतदानात सहभाग घेतला. प्रत्येक मताचे महत्त्व असताना आणि शरीर साथ देत नसतानाही आमदार जगताप तसेच मुक्ता टिळक यांनीही मतदानात सहभाग घेतला. अटीतटीच्या लढतीत भाजपचा तिसरा उमेदवारही निवडून आला.

हीच भाऊंच्या कामाची आणि श्रद्धेची पोचपावती

हीच भाऊंच्या कामाची आणि श्रद्धेची पोचपावती आहे, असे वक्तव्य आमदार जगतापांचे भाऊ शंकर जगताप यांनी केले.
प्रतिकूल परिस्थितीत आमदार जगताप अ‍ॅम्ब्युलन्समधून मुंबईला गेले आणि त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.

ही बाब आमच्यासाठी सार्थ अभिमानाची आहे. म्हणूनच विरोधी पक्षनेते फडणवीसांनी विजयानंतर सर्वांत आधी भाऊंचा उल्लेख केला आणि हा विजय जगतापांना समर्पित करत असल्याचे नमूद केले. हा क्षण कुटुंब आणि पिंपरी-चिंचवड शहरासाठी नक्कीच अभिमानास्पद ठरल्याची भावना शंकर जगताप यांनी व्यक्त केली.

पिंपरी-चिंचवडमधील भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप राज्यसभेच्या मतदानासाठी अ‍ॅम्ब्युलन्समधून मुंबईत गेले होते. त्यांनी आजारी असतानादेखील मतदानाचा हक्क बजावला. आजारी असल्याने लक्ष्मण जगताप यांना मतदानासाठी मुंबईत आणण्यासाठी रस्ते मार्गासह एअर लिफ्टचीही सुविधा तयार ठेवण्यात आली होती.

गेल्या दोन महिन्यांपासून ते आजाराने त्रस्त आहेत. कोमातून बाहेर आल्यानंतर २ जूनला त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. अशा परिस्थितीत ते मतदानाला मुंबईला गेले. कुटुंबीय मतदानासाठी त्यांना मुंबईला पाठवण्याच्या मन:स्थितीत नव्हते. मात्र पक्षाचा आग्रह असल्याने त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.

मुक्ता टिळक यांनी देखील केले मतदान
भाजप आमदार मुक्ता टिळक या आजाराने ग्रस्त असताना देखील मतदानासाठी विधान भवनात हजर राहिल्या. मुक्ता टिळक यांना तर स्ट्रेचरवर विधिमंडळात आणण्यात आले होते. त्यांच्यासोबत आमदार गिरीश महाजन होते.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या