मुंबई :टीव्ही इंडस्ट्रीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. अभिनेता दीपेश भान याने जगाचा निरोप घेतला आहे. दीपेश ‘भाभीजी घर पर हंै’ या लोकप्रिय टीव्ही मालिकेत मलखान सिंगच्या भूमिकेत दिसला होता.
या मालिकेशी तो बराच काळ जोडला गेला होता. मालिकेचे सहाय्यक दिग्दर्शक अभिनय यांनी अभिनेत्याच्या निधनाला दुजोरा दिला आहे. दीपेश याच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा आहे. दीपेशचे लग्न २०१९ मध्ये दिल्लीत झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपेश शुक्रवारी क्रिकेट खेळत होता, मात्र क्रिकेट खेळत असताना तो अचानक कोसळला. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
अभिनेता वैभव माथूरनेही दीपेश भानच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दीपेशच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त करताना ते म्हणाले की, होय तो आता राहिला नाही. यावर मला काहीही बोलायचे नाही, कारण सांगण्यासारखं काही उरलेलं नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की, दीपेश आणि माथूर या शोमध्ये मित्रांच्या भूमिकेत होते आणि दोघांमध्ये छान बॉण्डिंग झाले होते.